मडगावातील प्रकार, पालिकेने कारवाई करावी : नगरसेवक महेश आमोणकर यांची मागणी

प्रतिनिधी /मडगाव
मडगाव पालिका क्षेत्रातील गाडे पदपथ तसेच रस्त्यांच्या कडेला उभे असल्याने उच्च न्यायालयाने ते हटविण्याचे आदेश दिल्यानंतर पालिकेने कारवाई करून ते हटविले होते. परंतु आता अशा जागांवर अन्य काहींनी बेकायदा गाडे उभारल्याचे आढळून आले असून पालिकेने बेकायदा अतिक्रमण करणाऱयांवर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक महेश आमोणकर यांनी उचलून धरली आहे.
दोन दशकांपूर्वी पालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पदपथांवरील गाडय़ांवर कारवाई केली होती. कारवाई केलेल्या गाडय़ांचे पालिका क्षेत्रातील अन्य भागांमध्ये तात्पुरते पुनवर्सन करण्यात आले होते. या गाडेवाल्यांचे जुन्या बाजारातील टिटो बाजारनजीकच्या जमिनीत इमारत उभारून कायमचे पुनवर्सन करण्यात येणार होते. मात्र हे नियोजित पुनर्वसन अजूनही प्रत्यक्षात उतरलेले नाही. तात्पुरते पुनवर्सन करताना काही मोजक्मया गाडेवाल्यांना चांगल्या मोक्मयाच्या जागा मिळाल्या, तर बहुतेकांना मिळालेल्या जागा अंतर्गत ठिकाणी असल्याने त्यांना ग्राहक मिळत नसून दिवसाची रोजीरोटी सुटत नसल्याच्या तक्रारी त्यांच्याकडून बऱयाच काळापासून पालिकेकडे मांडल्या जात आहेत, याकडे आमोणकर यांनी लक्ष वेधले.
हा आपल्यावरील अन्याय : फुलारी
अशाच प्रकारे शरद फुलारी या वयस्कर व्यक्तीचा सालसेत फार्मसीसमोरील गाडा उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरच्या कारवाईत हटविण्यात आला होता. त्यांचे खारेबांद येथील अंतर्गत भागातील चिंचोळय़ा जागेत तात्पुरते पुनवर्सन करण्यात आले. येथे आपणास ग्राहकच लाभत नसल्याने जगणे कठीण झाले असल्याची कैफियत त्यांनी मांडली. मात्र आपला गाडा ज्या ठिकाणाहून हटविण्यात आला ती सालसेत फार्मसीसमोरील जागा भलत्याच व्यक्तीने काबिज करून व्यवसाय सुरू केला आहे. हा आपल्यावरील अन्याय असल्याचे वयोवृद्ध फुलारी यांनी सांगितले.
पाहणी करून कारवाई करावी
सदर बाब त्यांनी पालिकेच्या मार्केट समितीचे सदस्य नगरसेवक आमोणकर यांच्या नजरेस आणल्यानंतर त्यांनी शुक्रवारी सदर जागेची पाहणी केली असता तेथे अन्य व्यक्ती गाडा थाटून व्यवसाय करत असल्याचे आढळून आले. हा प्रकार गैर आहे व उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणारा आहे. त्यामुळे पालिकेचे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांनी सदर गाडय़ाची पाहणी करून कारवाई करावी, अशी मागणी आमोणकर यांनी केली आहे.









