कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक मोसमाची यंदा फेररचना करून रणजी, मुश्ताक अली स्पर्धेला प्राधान्य देण्याची सूचना
मुंबई
यावर्षी होणाऱया विजय हजारे, दुलीप व देवधर करंडक स्पर्धा कोरोना महामारीच्या कारणास्तव रद्द केल्या जाव्यात आणि रणजी करंडक व सईद मुश्ताक अली टी-20 स्पर्धांना प्राधान्य देऊन त्या पूर्ण स्वरूपात घ्याव्या, असे भारताचा माजी सलामीवीर व स्थानिक क्रिकेटमधील स्टार खेळाडू वासिम जाफरने सुचविले आहे.
महामारीमुळे क्रीडा क्षेत्र ठप्प झाले आहे. त्यामुळे खेळाडूंना मोठा ब्रेक मिळाला आहे. स्पर्धा खेळण्याची घाई न करता त्यांना पुरेशी संधी मिळावी, अशा बेताने स्थानिक मोसमाचे वेळापत्रक तयार करावे, असे जाफरला वाटते. भारताचा स्थानिक मोसम ऑगस्टमध्ये सुरू होतो. पण कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली असल्यामुळे बीसीसीआयने त्याबाबत अद्याप कोणतेच भाष्य केलेले नाही. क्रिकेट पुन्हा सुरू करण्याबाबत थांबा आणि प्रतीक्षा करा, असे धोरण त्यांनी अवलंबले आहे. ‘जेव्हा मोसमाची सुरुवात होईल तेव्हा आयपीएलला प्रथम प्राधान्य असेल, हे निश्चित आहे. या स्पर्धेनेच मोसमाची सुरुवात करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल,’ असे जाफर वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाला.
आयपीएलसाठी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये वेळ मिळेल, असे बीसीसीआयला वाटत असले तरी याच कालावधीत होणार असलेल्या आशिया चषक व टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या भवितव्यावर ते अवलंबून असेल, असे जाफरला वाटते. ‘आयपीएल संपल्यानंतर बीसीसीआय इराणी ट्रॉफी स्पर्धेने स्थानिक मोसम सुरू करण्याचा विचार करेल. सौराष्ट्र हे या स्पर्धेचे विद्यमान चॅम्पियन्स आहेत. त्यानंतर रणजी स्पर्धा सुरू करता येईल. पुढील वर्षीच्या आयपीएलसाठी लिलाव प्रक्रिया झाल्यानंतर मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धा घेतली जावी आणि हजारे, दुलीप व देवधर ट्रॉफी स्पर्धा रद्द कराव्यात. त्याच जागी रणजी व मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धा खेळाडूंना पुरेसा ब्रेक देऊन पूर्ण स्वरूपात घेतल्या जाव्या,’ असे जाफरने सुचविले आहे. या वेळापत्रकाप्रमाणे स्पर्धा आयोजित केल्यास खेळाडूंना तयारी करण्यास पुरेसा वेळही मिळू शकतो, असे त्याला वाटते.
कनिष्ठ स्तरावरही हाच फॉर्म्युला लागू करावा, असे तो म्हणतो. यू-23 व यू-19 वनडे स्पर्धा रद्द केल्या तर खेळाडूंना या स्पर्धांत पुरेशी संधी मिळू शकेल. त्याचप्रमाणे रणजी करंडकामध्येही वेगळी रचना करण्याचे त्याने सुचविले आहे. प्रत्येकी 9 संघांचे ए, बी, सी असे तीन गट करून पहिल्या दोन गटातील प्रत्येकी 3 व सी गटातील दोन संघ असे आठ संघ बाद फेरीत खेळतील. त्यांच्यात उपांत्यपूर्व फेरी घेतली जावी. ड (प्लेट) गटातील संघांना क गटात बढती मिळण्यासाठी अग्रस्थान मिळविण्याची अट ठेवावी. मात्र त्या संघाला उपांत्यपूर्व फेरीत खेळविले जाऊ नये. त्यामुळे स्पर्धा कमकुवत होण्याची शक्यता आहे,’ असे जाफरने स्पष्ट केले. जाफरने गेल्या मार्चमध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.









