तब्बल 215 मीटर उंची : सहा वर्षांत काम पूर्ण करण्याची योजना
प्रतिनिधी/ बेंगळूर
अयोध्या येथे भव्य राममंदिर उभारण्यासाठी कोनशिला बसविण्यात आली असतानाच आता बळ्ळारी जिल्हय़ातील पंपापूर (किष्किंदा) येथे जगातील सर्वात उंच हनुमानाची मूर्ती निर्माण केली जाणार आहे. या मूर्तीची उंची 215 मीटर इतकी असेल, अशी माहिती हनुमान जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष स्वामी गोविंद आनंद सरस्वती यांनी दिली. अयोध्या येथील रामजन्मभूमी मंदिराचे प्रमुख पुजारी आचार्य सत्येंद्रदास यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ही घोषणा केली.
राज्यातील बळ्ळारी जिल्हय़ातील हंपीनजीक पंपापूर येथे सुमारे 215 मीटर उंच हनुमान मूर्ती उभारण्यात येणार आहे. त्याकरिता अंदाजे 1,200 कोटी रुपये खर्च होईल. हंपी येथील पंपापूर हेच रामायणामधील किष्किंदा हे ठिकाण असल्याची हिंदुंची श्रद्धा आहे. हनुमानाचा जन्म किष्किंदा येथे झाल्याचा उल्लेख रामायणामध्ये आहे.
देशभरात रथयात्रा काढणार
पंपापूर येथे भव्य हनुमान मूर्ती निर्माण करण्यासाठी हनुमान जन्मभूमी ट्रस्ट देशभरात रथयात्रा काढणार आहे. सर्व काही नियोजनाप्रमाणे झाल्यास 6 वर्षात मूर्ती उभारण्याचे काम पूर्ण होईल. सध्या हंपी येथील अंजनाद्री टेकडीवरील हनुमान मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना 550 पायऱया चढाव्या लागतात. मात्र, आगामी 6 वर्षांत निर्माण होणाऱया प्रस्तावित भव्य हनुमान मूर्तीचे सहज दर्शन होण्यासाठी भाविकांना सर्व प्रकारची व्यवस्था केली जाणार आहे.









