गावकमिटी, ग्रा. पं. सदस्य यांच्या बैठकीत घेतला निर्णय : नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
वार्ताहर / किणये
ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. तालुक्मयाच्या पश्चिम भागातील अनेक गावांमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. यामुळे आपल्या गावातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व गाव कोरोनामुक्त करण्यासाठी हंगरगे गावात मंगळवार दि. 18 ते 24 मे पर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. गावकमिटी, ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला आहे.
गावातील महालक्ष्मी मंदिरात बैठक घेण्यात आली. या बैठकीत गावात सात दिवस कडक लॉकडाऊन करण्याचे ठरविण्यात आले आहे. तसेच बाहेरील नागरिक गावामध्ये येऊ लागले आहेत व काही जण विनाकारण गावातून बाहेर पडू लागले आहेत. याचा धोका गावातील नागरिकांच्या आरोग्यास होऊ शकतो. यामुळेच सात दिवस लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. तसेच सर्दी, ताप, खोकला या रुग्णांच्या संख्येतही वाढ होऊ लागली आहे. नागरिकांचे आरोग्य सुदृढ रहावे व कोरोनाच्या प्रसाराला ब्रेक लागावा, या हेतूने स्वयंस्फूर्तीने सात दिवस लॉकडाऊन करण्याचे ठरविले आहे.
आजारी व्यक्तीं-चारा आणण्यासाठी सवलत
या सात दिवसांमध्ये फक्त आजारी व्यक्तींसाठी औषध आणण्यासाठी व जनावरांना चारा आणण्यासाठी सवलत देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त गावातून कोणीही बाहेर जाऊ नये व बाहेरील व्यक्तींनी गावात प्रवेश करू नये, असा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच घरातून बाहेर पडताना तोंडाला मास्क घालून बाहेर पडावे. जर कोणी मास्क घातला नसल्यास त्या व्यक्तीस 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. तसेच विनाकारण गावातून एखादी व्यक्ती बाहेर गेल्यास त्या व्यक्तीकडून 5 हजार रुपयांचा दंड घेण्याचा ठरावही या बैठकीत घेण्यात आला आहे.
नियमांचे पालन करून सहकार्य करा
गावच्या नागरिकांच्या हितासाठीच हे लॉकडाऊन करण्यात आले असून त्याचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
बैठकीला कृष्णा हुंदरे, विष्णू सोनोलकर, गोपाळ गोडसे, दिलीप कांबळे, बाळू पाटील, कृष्णा शट्टू पाटील, विशाल सावंत, यल्लाप्पा पाटील, बाळू गोडसे, निवृत्ती तळवार, हणमंत पाटील, मोनाप्पा चलवेटकर, परशराम पाटील, अर्जुन पाटील, राजू पाटील, नारायण पाटील, जयवंत पाटील, भैरू पाटील, यल्लाप्पा पाटील, उमेश गोडसे, उमेश सावंत, मारुती सावंत, यल्लाप्पा काटगाळकर, उमेश पाटील, राजू कांबळे आदी उपस्थित होते.
होनकल गावात सात दिवस कडक बंदचा निर्णय
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव अधिक वाढल्याने खानापूर तालुक्मयातील होनकल गावात सात दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय ग्रामस्थ पंचकमिटीने घेतला आहे. त्यामुळे मंगळवारपासून शनिवारपर्यंत गावात बाहेरच्या व्यक्तींना प्रवेशबंदी असून गावातील लोकांनीही बाहेर न पडता घरी राहून कडक वार पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना संसर्गामुळे सर्वांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. परिसरातील अनेक गावात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळून येत असल्याने होनकल गावातदेखील नियमांचे पालन करून आगामी सात दिवस शनिवारपर्यंत गावकऱयांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचा निर्णय येथील माऊली मंदिरात गाऱहाणा घालून करण्यात आला. या काळात गावातील सर्व दुकाने बंद ठेवून बाहेर येण्या-जाण्यासही निर्बंध घालण्यात आले आहेत.









