वृत्तसंस्था/ बॅसेल
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या स्वीस खुल्या आंतरराष्ट्रीय सुपर-300 पुरूष आणि महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेला मंगळवारपासून येथे प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या पी.व्ही. सिंधूची उपांत्य फेरीत गाठ सायना नेहवालशी पडण्याची शक्यता आहे. दरम्यान पुरूष दुहेरी प्रकारात भारताचे सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी हे जेतेपदासाठी फेव्हरिट म्हणून ओळखले जातात.
गेल्या जानेवारी महिन्यात थायलंडमध्ये झालेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या तीन विविध स्पर्धामध्ये पी.व्ही. सिंधूची कामगिरी समाधानकारक झाली नव्हती. मात्र बॅसेलमध्ये सुरू होणाऱया या स्पर्धेत सिंधू आणि सायना नेहवाल यांना जेतेपदाची संधी निश्चितच आहे. या स्पर्धेत 2011 आणि 2012 साली सायना नेहवालने पाठोपाठ दोनवेळा महिला एकेरीची अजिंक्यपदे मिळविली होती. 2015 साली या स्पर्धेत पुरूष एकेरीचे जेतेपद किदांबी श्रीकांतने मिळविले होते तय 2016 आणि 2018 साली भारताच्या प्रणॉय आणि समीर वर्मा यांनी पुरूष एकेरीत आपले वर्चस्व ठेवले होते. पुरूष दुहेरीत भारताची द्वितीय मानांकित जोडी सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी यांना जेतेपद मिळविण्याची नामी संधी आहे.









