बेळगाव
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या घरांना भेटी देऊन सरकारच्यावतीने त्यांचा गौरव केला.
चन्नम्मानगर येथील शतायुषी राजेंद्र धर्माप्पा कलघटगी यांच्या घरी भेट देऊन जिल्हाधिकाऱयांनी त्यांचा सत्कार केला. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यासाठी लढलेल्या सेनानींचा गौरव करण्याचे भाग्य आपल्या वाटय़ाला आले. स्वातंत्र्यासाठी लढलेल्या या महनीयांचे जीवन साऱयांनाच आदर्श ठरणार आहे, असे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.
राजेंद्र कलघटगी यांनी शतक पूर्ण केले आहे. त्यांनी स्वतः आपले नित्यक्रम जिल्हाधिकाऱयांसमोर सांगितले. आपण रोज पहाटे 4 वाजता उठतो. योगासने, कपालभाती, अनुलोम-विलोम करून नंतर दूध व बिस्किटांचे सेवन करतो. जवळच्या उद्यानात मॉर्निंग वॉकलाही जातो. आपल्याला अस्थमा, मधुमेह आहे. रोज 16 गोळय़ा खाव्या लागतात. मात्र, नियमित व्यायामामुळे आरोग्य चांगले असल्याचेही शतायुषी राजेंद्र कलघटगी यांनी सांगितले.
महात्मा गांधीजींनी चलेजाव नारा दिला. त्यावेळी मी 22 वर्षांचा होतो. मित्रांसमवेत रेल्वेरुळ उखडून ब्रिटिशांच्या विरोधातील आंदोलनात भाग घेतला. मुंबईहून येणारी दैनिके घरोघरी वाटताना पोलिसांनी अटक केली. आपल्याला कॅम्प पोलीस स्थानकात नेले. सात महिने कारावासात राहावे लागले. देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी आपल्या उत्साहाला पारावार राहिला नाही, अशा शब्दात त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
त्यानंतर टी. गुरुनाथ राव यांच्या घरी जाऊन जिल्हाधिकाऱयांनी त्यांचा सत्कार केला. 98 वर्षांचे गुरुनाथ राव सध्या आजारी आहेत. समृद्धी कॉलनी, वडगाव येथील गंगाधर विनायक कामत यांची भेट घेऊन त्यांचाही सत्कार करण्यात आला. ते 99 वर्षांचे आहेत. यावेळी प्रांताधिकारी रविंद्र करलिंगण्णावर, कन्नड व सांस्कृतिक खात्याच्या विद्यावती बजंत्री, माहिती खात्याचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर, तहसीलदार आर. के. कुलकर्णी आदी उपस्थित होते. प्रशासनाच्यावतीने स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनीही आनंद व्यक्त केला.









