नव्या आर्थिक सुधारणा आणि खासगीकरण, उदारीकरण या पार्श्वभूमिवर कोरोनानंतरचे जग आणि भारत कसा असेल यावर विविध पातळीवर चर्चा, मंथन सुरु आहे. जगात मंदीची लाट आहे. अनेक देशात आणि भारतातही महागाई कळस गाठते आहे. एकीकडे कोरोना संकट, दुसरीकडे बेरोजगारी, तिसरीकडे शेती, व्यापार, उद्योगधंदे अडचणीत व गरीब-श्रीमंत दरी वाढत चाललेली या पार्श्वभूमिवर शेअर मार्केट नव-नवे उच्चांक करत आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 50 हजाराचा टप्पा पार करुन 60 हजारावर झेपावताना दिसतो आहे. विदेशी गुंतवणूकदार भारतात मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करताना दिसत आहेत. देशात-विदेशी चलन साठा मोठय़ा प्रमाणात जमा होत आहे. भारतीय अर्थव्यवस्था नवी झेप घेईल, असा आशावाद व्यक्त होत असतानाच प्रचलित व्यवस्थेत, नोकरी, व्यवसाय, गुंतवणूक, शिक्षण, धंदे यामध्ये आमूलाग्र बदल होतील, असे म्हटले जाते आहे. देशभर कोरोना लाट हळूहळू ओसरते आहे. मोठय़ा प्रमाणात लसीकरण झाले आहे. लसीकरणाचा वेग आणि परिणाम यातून विश्वास निर्माण झाला आहे. यंदा देशभर पाऊस समाधानकारक बरसला आहे. या साऱया पार्श्वभूमिवर कोरोना नंतरचे जग कसे असेल हे समजून घेतले पाहिजे. मध्यतंरी अर्थतज्ञ व संगणक तज्ञ अच्युत गोडबोले यांनी विद्यमान 70 टक्के नोकऱयांची गरज उरणार नाही. आगामी काळ हा माहिती तंत्रज्ञान, नॅनो टेक्नॉलॉजी व बायो टेक्नॉलॉजीचा असेल, असे म्हटले आहे. कोणतीही क्रांती वर्षानुवर्षे टिकणार नाही. नवे संशोधन, नव्या क्रांतीचा प्रभाव पाच-सात वर्षे म्हणजे फार झाला असे सांगत कोरोनानंतरच्या जगात नवे ज्ञान, तंत्रज्ञान, कौशल्य आणि संपर्क असलेल्यांना मोठी संधी आहे, असे म्हटले हेते. अविनाश धर्माधिकारी वगैरेही हेच सांगत आहेत आणि आपण सर्वांनी उज्ज्वल भवितव्यासाठी या बदलांना आणि त्यातील कौशल्यांना आत्मसात करुन त्यावर स्वार होण्याची गरज आहे. भारत हा सर्वात मोठी तरुण संस्था असणारा देश आहे. तथापि आजची युवा पिढी या नव्या जाणीवा आणि कौशल्यापासून लांब आहे. सुरक्षित सरकारी नोकरी, सातवे वेतन, मलई, संघटित भ्रष्टाचार यातून बाहेर पडून नव्या सुधारणा, ज्ञान, तंत्रज्ञान आत्मसात करून त्यावर स्वार होणे गरजेचे आहे. आगामी काळात मक्तेदारी संपुष्टात येणार हे वेगळे सांगायला नको. औरंगाबाद वरून एक बातमी आली आहे. तेथे औद्योगिक वसाहतीला, विजेसाठी स्वतंत्र वितरण परवाना देण्यात आला आहे. देशातला हा पहिलाच प्रयोग आहे. या परवान्यामुळे औरंगाबाद औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना सध्यापेक्षा 40 ते 50 टक्के कमी दरात वीज उपलब्ध होणार आहे. सांगली, कोल्हापूर जिह्यातले उद्योजक मध्यंतरी आम्हाला महाराष्ट्राचा वीज मंडळाचा चढा दर परवडत नाही. आम्ही शेजारी सीमाभागात उद्योग-व्यवसाय स्थलांतरित करतो, असे म्हणत होते. त्यांनी मुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांना निवेदने दिली होती व कर्नाटक सरकारने त्यांच्यासाठी रेड कारपेट पसरायला प्रारंभ केला होता. स्वस्त विजेचा हा प्रयोग औरंगाबादेत यशस्वी झाला तर तो हळूहळू इतरत्र केला जाणार, हे वेगळे सांगायला नको. महाराष्ट्रात उद्योजकांना सरासरी नऊ रु. युनिट दराने वीज दिली जाते. हा दर चार किंवा पाच रु. युनिट झाला तर मोठा फरक पडेल. वस्त्राsद्योग,सूत गिरण्या, कोल्ड स्टोअरेजसह मोठय़ा उद्योगांना या प्रयोगातून बुस्ट मिळेल. उद्योग,व्यापार यांना चालना मिळेल, हे स्पष्ट आहे. कोरोना व लॉकडाऊनमुळे आज अनेक देश ठप्प आहेत. त्यांची अर्थव्यवस्था अडचणीत आहे. असे झाले तर देशाची निर्यात वाढेल आणि नवे रोजगार, नवे व्यवसाय गती घेतील. औरंगाबादजवळचा शेंद्रा बिडकीत औद्योगिक वसाहतीचे संचालन करणाऱया ‘ऑरेंज सिटी’ चे संचालन करणाऱया संस्थेने आपल्या क्षेत्रातील उद्योगांना स्वतंत्रपणे वीज वितरण करण्याची परवानगी मागितली होती व ती मिळाली आहे. सुमारे 3300 हेक्टरवर हे औद्योगिक क्षेत्र पसरले आहे. विजेचे प्रचंड दर आणि गुंडगिरी, लालफित यामुळे तेथे प्रचंड नाराजी व अस्वस्थता होती. राज्यात अनेक ठिकाणी हीच अवस्था आहे. तोडपाणी करणाऱया टोळय़ा जोरावर आहेत. आपण गुजरात, कर्नाटक यांच्या नावाने ओरडत असतो पण, त्यांनी उद्योग, व्यवसायासाठी जी पावले उचलली ती दुर्लक्षित करतो. एक काळ होता तेव्हा विक्रीतून फायदा मिळवला जाई. आता खरेदीतून फायदा मिळवला जातो. जगात जेथे स्वस्त, उत्तम तेथून खरेदी आणि बाजारपेठेत स्वस्तात विक्री असे नवे सूत्र आकार घेते आहे. ऑनलाईन मार्केटिंग सर्वत्र गती घेते आहे. जनसामान्य पिन टू पियानो खरेदी ऑनलाईन खरेदी करताना दिसत आहेत. स्वस्त, उत्तम व दर्जेदार सहज उपलब्ध होणाऱया मालाला ग्राहकांची पहिली पसंती असते. अशावेळी जगाच्या तुलनेत उत्पादन खर्च कमी करुन उत्पादन केले पाहिजे व बाजार तंत्र अवलंबले पाहिजे. तरच टिकाव लागणार आहे. या पार्श्वभूमिवर औरंगाबादचा हा प्रयोग महत्त्वाचा ठरेल. तो यशस्वी झाला तर गावपातळीवर शहर पातळीवरही असे छोटे-छोटे प्रयोग होऊ शकतात. वीज वितरण कंपनीच्या दरात आणि कारभारात बदल झाले तर आश्चर्य नको. तसे झाले आणि दर व सेवा यांची स्पर्धा सुरु झाली तर वीज चोरी, गळती, भ्रष्टाचार, भले मोठे पगार, सवलती यात अडकलेली व महागलेली वीज ग्राहकांना रास्त दरात मिळेल, विजेच्या बाबतीत जसे हे नवे पाऊल पडते आहे तशी पावले आगामी काळात अनेक क्षेत्रात पडणार, हे पक्के आहे. देशाच्या सार्वहिताची आणि कोरोनानंतरच्या विविध क्षेत्रातील संधीची पावले ओळखून धोरणे आखली पाहिजेत. स्वस्त वीज प्रयोग हा बिगूल आहे. नवा अध्याय आहे. तो औरंगाबादेत वाजला आहे. तो आवाज सर्वदूर ऐकला गेला पाहिजे. समजून घेतला पाहिजे आणि उद्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पावले टाकली पाहिजेत.
Previous Article….हा मनुष्यस्वभाव नाही
Next Article जोडप्याचा रेल्वेत अनोखा विवाह
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








