वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अनमॅन्ड एरियल व्हेईकल म्हणजेच ड्रोनवर होत असलेल्या कामादरम्यान आता भारतीय सैन्य रिमोटने किंवा स्वयंचलित वाहनांवर (अनमॅन्ड ग्राउंड व्हेईकल) लक्ष केंद्रीत करत आहे. सैन्याला स्वदेशी कंपन्यांकडून अनमॅन्ड ग्राउंड व्हेईकल्स हवी असून ती टेहळणी आणि रेकीसाठी वापरली जाणार आहेत. तसेच जखमी सैनिकांना सुरक्षित बाहेर काढण्यापासून स्फोटके शोधून ती नष्ट करण्याचे काम ही वाहने करणार आहेत. ही अनमॅन्ड व्हेईकल्स वाळवंटापासून पर्वतीय अन् मैदानी क्षेत्रात काम करण्यासाठी सक्षम असणार आहेत.
सैन्य आता इंडस्ट्री, स्टार्टअप, इनोव्हेटर्सना एका व्यासपीठावर आणणार आहे. 9-14 डिसेंबर दरम्यान बबीना रेंजमध्ये (झाशीनजीक) विविध स्वदेशी कंपन्या वेगवेगळय़ा प्रकारच्या अनमॅन्ड व्हेईकल्सचे सादरीकरण करणार आहेत. ही वाहने विविध शेणीतील असतील, जी रेकीपासून जखमींना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी वापरली जाणार आहेत.
एकूण 12 कंपन्या यात सामील होणार आहेत. सैनिकांशिवाय ऑटोनॉमस मोडमध्ये किंवा रिमोटली कंट्रोल मोडमध्ये धावू शकणारी ही वाहने असणार आहेत. वाळवंट, मैदानी भाग, पर्वत किंवा अत्यंत अधिक उंचीवरील भागात ही वाहने वापरता येणार आहेत. 250-500 किलोग्रॅमचे वजन वाहून नेऊ शकेल आणि 12 तास न थांबता काम करू शकणाऱया वाहनाची सैन्याला गरज आहे.
रेकीसाठी दिवसाबरोबरच नाइट व्हिजन क्षमता असणारे आणि किमान दोन किलोमीटर अंतरापर्यंत संपर्क साधू शकणारे हे वाहन असेल. मीडियम मशीन गनसाठी प्लॅटफॉर्मचे काम करू शकणाऱया अनमॅन्ड ग्राउंड व्हेईकलची गरज आहे. स्फोटकांचा शोध घेत ती नष्ट करण्यासह किमान 500 मीटर अंतरावरून रिमोटली ऑपरेट होण्याची क्षमता यात असणार आहे. तर या वाहनांचा वेग किमान 10 किलोमीटर प्रतितास असणे आवश्यक आहे.









