वृत्तसंस्था/ बेंगळूर
येथे सुरू असलेल्या 47 व्या कनिष्ठांच्या आणि 37 व्या उपकनिष्ठांच्या मुले आणि मुलींच्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत बंगालच्या स्वदेश मोंडलने 400 मी. मिडलेमध्ये नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविला.
मुलांच्या गटातील 400 मी. मिंडले प्रकारात चार मिनिटे, 34.15 सेकंदाचा अवधी घेत नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविताना 2018 साली पुणे येथे झालेल्या स्पर्धेत अदवैत पागेने नोंदविलेला 4 मिनिटे 34.76 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम मागे टाकला. या क्रीडा प्रकारात कर्नाटकाच्या शोहन गांगुलीने रौप्यपदक मिळविताना चार मिनिटे, 34.39 सेकंदाचा अवधी घेतला. कर्नाटकाच्या कल्प बोहराने 4 मिनिटे 43.05 सेकंदाचा अवधी घेत कांस्यपदक मिळविले.
या स्पर्धेत गट-2 मुलींच्या 100 मी. बटरफ्लायमध्ये कर्नाटकाच्या हशिका रामचंद्रने नव्या राष्ट्रीय विक्रमांसह सुवर्णपदक मिळविताना 1 मिनिट, 0.5.51 सेकंदाचा अवधी घेत यापूर्वी म्हणजे 2016 साली मयुरी लिंगराजने नोंदविलेला 1 मिनिट, 05.98 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम मागे टाकला. या क्रीडाप्रकारात कर्नाटकाच्या ऋषिका मांगलेने रौप्य तर महाराष्ट्राच्या प्रतिष्ठा डांगीने कांस्य घेतले. या स्पर्धेच्या पदक तक्त्यामध्ये यजमान कर्नाटकाने 134 पदकांसह पहिले स्थान मिळविले असून महाराष्ट्र 62 पदकांसह दुसऱया तर तामिळनाडू 38 पदकांसह तिसऱया आणि बंगाल 25 पदकांसह चौथ्या स्थानावर आहे.









