सत्तांतर जवळ आले असताना अमेरिकेत नवा वाद, तज्ञांमध्ये दुमत
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप जाताजाता आणखी एका वादात अडकण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर 2016 च्या अध्यक्षपदाच्या निवणुकीत रशियाला हस्तक्षेप करू देण्याचा आरोप आहे. या आरोपातून
स्वतःला दोषमुक्त म्हणून घोषित करण्याच्या प्रयत्नात ते असल्याचे बोलले जात आहे.
या आरोपाची चौकशी अमेरिकेची गुप्तचर संस्था एफबीआयकडून सुरू आहे. मात्र ते अध्यक्ष असताना या चौकशीला गती मिळाली नव्हती. आता त्यांना अध्यक्षपद सोडावे लागणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे नवे अध्यक्ष जोसेफ बायडन या आरोपाच्या चौकशीला गती देतील अशी शक्यता अनेक तज्ञांनी व्यक्त केली आहे. तशी चौकशी झाल्यास ट्रंप यांच्या अडचणीमध्ये वाढ होईल असे अनुमान होईल. परिणामी, आपल्या अध्यक्षीय अधिकारांचा उपयोग करून स्वतःलाच दोषमुक्त करता येईल काय याची कायदेशीर चाचपणी ते करीत असल्याचे समजते. इतर आरोपींच्या संदर्भात अशी दोषमुक्ती देण्याचा अधिकार अमेरिकेच्या अध्यक्षांना असतो. मात्र, हा अधिकार ते स्वतःसाठीच उपयोगात आणू शकतात काय हे अद्याप स्पष्ट नाही. अमेरिकेच्या आजवरच्या इतिहासात असा प्रसंग आलेला नाही. त्यामुळे या संदर्भातील कायद्याची स्थितीही स्पष्ट नाही, असे मत अमेरिकेतील अनेक राजकीय आणि विधीक्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केले आहे.
परिणाम काय होईल
ट्रंप यांचे आता अध्यक्षदावर केवळ 11 दिवस उरले आहेत. त्यांना 20 जानेवारीच्या पूर्वी हे पद सोडावे लागणार हे उघड आहे. त्यांनी स्वतः सत्तांतर सुरळीत होईल असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे पद सोडण्यापूर्वी ते स्वतःवरील आरोपांसंदर्भात काय निर्णय घेतात याकडे केवळ अमेरिकेचे नव्हे, तर साऱया जगाचे लक्ष लागले आहे. ट्रंप यांच्या दोषमुक्त घोषित करण्याच्या अधिकाराच्या कार्यकक्षेसंबंधी अमेरिकेतील विधीतज्ञांमध्ये दुमत आहे.
मते मिळविण्याचा आदेश
ट्रंप यांनी एका सरकारी अधिकाऱयाला स्वतःसाठी मते मिळविण्याची सूचना केली होती. त्याची ऑडिओ क्लिप प्रसिद्ध झाली आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेच्या संसदेत जो हिंसाचार झाला, तोही त्यांच्याच एका ट्विटर संदेशामुळे झाला असा आरोप आहे. त्याचीही चौकशी ते अध्यक्षपदावरून दूर झाल्यानंतर होण्याची शक्यता आहे. या तिहेरी कोंडीतून सुटण्यासाठी ते त्यांचा अधिकार उपयोगात आणणार का, हा प्रश्न असून त्याचे परिणाम काय होतील याचीही चर्चा आहे. एकंदर सत्तांतर जवळ असले असताना वादही निर्माण होत आहेत.









