स्मार्ट सिटीच्या अर्धवट कामांमुळे नागरिक हैराण : टिळकवाडी परिसरातील देशमुख रोड सहा महिन्यांपासून बंद असल्याने वाहनधारकांचे हाल

प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत टिळकवाडी परिसरातील देशमुख रोडचा विकास करण्यात येत आहे. विविध कामांकरिता हा रस्ता मागील सहा महिन्यांपासून बंद असल्याने वाहनधारकांचे हाल होत आहेत. स्मार्ट सिटीचे काम करा किंवा थांबवा पण ये-जा करण्यासाठी रस्त्याची दुरुस्ती त्वरित करा, अशी मागणी येथील रहिवाशांतून होत आहे. तसेच गेल्या कित्येक महिन्यांपासून पहिल्या रेल्वेगेटजवळ असलेली बॅरिकेड्स हटविण्यात यावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

स्मार्ट सिटी योजनेतील कामांबाबत वारंवार तक्रारी करण्यात येत आहेत. सदर कामे वेळेवर होत नाहीत. तसेच निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. टिळकवाडी भागातील विविध रस्त्यांचा विकास करण्याचे काम सुरू आहे. पण कामे रेटून नेण्याचा प्रकार सुरू आहे. दर्जा तपासून काम करण्यात येत असल्याचा कांगावा स्मार्ट सिटी कंपनीचे अधिकारी करीत असतात. त्यामुळे टिळकवाडी भागातील साहित्याचा दर्जा तपासला नाही का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. कामे करताना स्मार्ट सिटी कंपनीचे अधिकारी उपस्थित राहणे आवश्यक आहे. अधिकाऱयांच्या देखतच साहित्याचा वापर करणे गरजेचे आहे. मात्र कामे सुरू असलेल्या ठिकाणी स्मार्ट सिटी कंपनीचे अधिकारी कधी फिरकतच नसल्याचे आढळून आले आहे.
स्मार्ट सिटी नकोच म्हणण्याची वेळ

देशमुख रोडवरील समस्या पाहता स्मार्ट सिटी नकोच म्हणण्याची वेळ आली आहे. या रस्त्याच्या विकासाचे काम सुरू करून सहा महिने उलटले. वास्तविक पाहता लॉकडाऊन काळात रस्त्यावर वाहतूक नसल्याने काम पूर्ण करण्यास चांगली संधी होती. पण सदर काम हाती घेण्यात आले नाही. देशमुख रोडचे आरपीडी कॉर्नर ते पहिल्या रेल्वेगेटपर्यंत काँक्रिटीकरण हाती घेण्यात आले असून याकरिता रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात आला आहे. यापूर्वी परिसरात रस्त्याच्या दुतर्फा पाईप घालण्यासाठी खोदाईचे काम हाती घेतले होते. याकरिता वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. अशातच लॉकडाऊनमुळे पहिल्या रेल्वेगेटचा रस्ता बंद ठेवण्यात आला होता. आता पुन्हा काँक्रिटीकरणासाठी पहिले रेल्वेगेट ते आरपीडी कॉर्नरपर्यंतचा देशमुख रोड बंद ठेवला आहे. परिणामी परिसरातील रहिवाशांसह येथील कार्यालये, महाविद्यालयांना जाणाऱया नागरिकांचे हाल होत आहेत. आरपीडी कॉर्नर येथे रस्ता बंद ठेवल्याने दुचाकी वाहनधारकांना वाहने आरपीडी चौकात पार्क करावी लागत असल्याने चौकात वाहतुकीची कोंडी होत आहे. पार्सल सेवा पुरविणाऱया कामगारांना तसेच सायकलस्वारांना पायी ये-जा करण्याची वेळ आली आहे.
या भागात विविध महाविद्यालये आणि खासगी कार्यालये असल्याने रस्त्यावर दुचाकी वाहनांची वर्दळ असते. रस्ता बंद असल्याने व्यावसायिकांचेही नुकसान झाले आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले. अशातच रस्त्याच्या कामामुळे ग्राहक फिरकत नाहीत, अशा दुहेरी समस्येत देशमुख रोडवरील व्यावसायिकवर्ग सापडला आहे. स्मार्ट सिटी कंपनीचे कार्यालय देशमुख रोडपासून काही अंतरावर आहे. तरीदेखील सदर कामे पूर्ण करण्याकडे कंत्राटदार व स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांचे दुर्लक्ष झाले आहे. स्मार्ट सिटी योजनेच्या कामाला सुरुवात करून तीन वर्षे लोटली पण कोणत्याच रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. सर्वत्र अर्धवट कामे असल्याने स्मार्ट सिटी नको रे बाबा… असे म्हणण्याची वेळ आली आहे.
रस्त्यांवर अडथळय़ांची शर्यत
शहर आणि उपनगरांतील प्रत्येक रस्त्यावर अडथळय़ांची शर्यत आहे. ही शर्यत मागील तीन वर्षांपासून पार करताना शहरवासीय अक्षरशः कंटाळले आहेत. प्रत्येक काम पूर्ण करण्यासाठी विलंब होत असल्याने वाहनधारक आणि स्थानिक रहिवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. घरातून बाहेर पडताच स्मार्ट सिटीच्या खड्डय़ांचा सामना करावा लागतो. काही नागरिकांच्या घराच्या प्रवेशद्वारातच खड्डे आणि चरी असल्याने अपघाताला सामोरे जावे लागत आहे. देशमुख रोडच्या कामासाठी येथील विविध पेठेच्या रस्त्यावरील वाहतूक अडविण्यासाठी विद्युतखांब घालून अडथळे निर्माण करण्यात आले आहेत. वास्तविक पाहता स्थानिक रहिवाशांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही, याची खबरदारी घेण्याची जबाबदारी अधिकारी व कंत्राटदाराची आहे. पण निविदेतील सर्व अटी व नियमावली धाब्यावर बसवून ही कामे करण्यात येत आहेत. याकडे वरि÷ अधिकाऱयांसह नगरविकास खाते, जिल्हा पालकमंत्री, जिल्हाधिकारी या सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे.
पहिले रेल्वेगेट येथील बॅरिकेड्स हटविण्याची मागणी देशमुख रोडला जोडणारे रस्ते बंद असल्याने नागरिकांना वळसा घालून ये-जा करावी लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. अशातच पहिल्या रेल्वेगेट येथील बॅरिकेड्स वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. लॉकडाऊन काळात वाहतूक वळविण्यासाठी पहिल्या रेल्वेगेट येथे बॅरिकेड्स लावले होते. हे बॅरिकेड्स अद्यापही हटविले नसल्याने वाहनधारकांना वळसा घालून ये-जा करावी लागत आहे. सध्या पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. अशातच देशमुख रोड, शुक्रवार पेठ, आरपीडी महाविद्यालय अशा विविध भागात जाणाऱया वाहनधारकांना बॅरिकेड्समुळे वळसा घालून जावे लागत असल्याने अतिरिक्त इंधन खर्च होत आहे. त्यामुळे पहिले रेल्वेगेट येथील बॅरिकेड्स हटवावेत, अशी मागणी होत आहे.









