अनेक ठिकाणी घातलेले पेव्हर्स निकृष्टदर्जाचे, नागरिकांतून संताप
प्रतिनिधी/ बेळगाव
स्मार्टसिटींच्या कामांतर्गत शहरात रस्त्याचे काम सुरु आहे. तसेच ठिकठिकाणी पेव्हर्स ब्लॉक घालण्यात आले आहेत. मात्र या पेव्हर्समध्येच खड्डे पडल्याने पाणी साचते आहे. पेव्हर्सचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने ही समस्या उद्भवली असून पेव्हर्स घालणेच बंद करा, अशी नागरिकांची मागणी आहे.
सध्या एक तर सगळीकडे रस्ते बांधकाम सुरु आहे. त्यामुळे नागरिकांना वळसे घालून वेगवेगळय़ा रस्त्यांनी प्रवास करावा लागतो. दुसरीकडे पेव्हर्स घालण्याचे काम सुरु असून त्याचाही वापर नागरिकांना करता येत नाही. जिथे पेव्हर्स घातले गेले आहेत तेथून यावे म्हटले तर या पेव्हर्सचीच दुरावस्था झाली आहे.
पेव्हर्स घालताना दर्जा राखला न गेल्याने पेव्हर्स फुटले आहेत आणि ठिकाठिकाणी या पेव्हर्सवरच पाणी साचले आहे. हिंदवाडी भागात तरी अवघ्या तीन वर्षांपूर्वीच स्मार्टसिटीच्यानिधीमधून पेव्हर्स घातले गेले. परंतु आज या पेव्हर्सवरुन चालणे अवघड होवुन बसले आहे. रस्त्यांचीही दुरावस्था असून वाहनांची या रस्त्यावर गर्दी असते. आणि जर पेव्हर्सवरुन जायचे म्हटले तर याहूनही अधिक कठीण परिस्थिती आहे. त्यामुळे पेव्हर्स न घातला पक्के फुटपाथ तयार करा, अशी नागरिकांची मागणी आहे.









