ऑनलाईन टीम / माद्रिद :
स्पेनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याने मागील तीन महिन्यांपासून देशात लागू असणारी राष्ट्रीय आणीबाणी हटविण्यात आली आहे. तसेच अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय पर्यटनालाही मुभा देण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना स्पेनने 14 मार्चपासून देशात राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली होती. त्यामुळे देशातील आर्थिक व्यवहार ठप्प झाले. परिणामी सरकारचे महसुली उत्पन्नही घटले. दरम्यान, या तीन महिन्यांच्या काळात स्पेनमधील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे सरकारने राष्ट्रीय आणीबाणी हटवण्याचा निर्णय घेतला.
विस्कटलेली अर्थव्यवस्थेची घडी नीट बसवण्यासाठी स्पेनने आता आंतरराष्ट्रीय पर्यटनावरील निर्बंध उठवले आहेत. पर्यटनासाठी देशाच्या सीमा खुल्या केल्या आहेत. त्यामुळे इतर देशातील नागरिक पर्यटनासाठी स्पेनमध्ये येऊ शकतात. त्यांना 14 दिवस स्पेनमध्ये क्वारंटाईन करण्याची अट देखील स्पेनने रद्द केली आहे.









