वृत्तसंस्था/ लंडन
2020 च्या टेनिस हंगामातील येथे सुरू असलेल्या एटीपी टूरवरील पुरुषांच्या अंतिम टेनिस स्पर्धेत स्पेनचा माजी टॉप सीडेड राफेल नदालने ग्रीसच्या सित्सिपसचा पराभव करत एकेरीत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले आहे. नदालने आतापर्यंत एकदाही एटीपी टूरवरील या अंतिम स्पर्धेचे जेतेपद मिळविलेले नाही.
34 वषीय नदालने एटीपी टूरवरील या अंतिम स्पर्धेसाठी सलग 16 वर्षे आपली पात्रता सिद्ध करण्याचा विक्रम नोंदविला आहे. सदर स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने खेळविली जात असून एकूण आठ टेनिसपटूंचा सहभाग आहे. नदालने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत विविध स्पर्धांमध्ये एकेरीची 86 अजिंक्मयपदे मिळविली आहेत. गुरुवारी झालेल्या या स्पर्धेतील सामन्यात नदालने ग्रीसच्या माजी विजेत्या स्टिफॅनोस सित्सिपसचा 6-4, 4-6, 6-2 असा पराभव करून शेवटच्या चार खेळाडूत आपले स्थान निश्चित केले. नदालने या स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात रशियाच्या रुबलेव्हचा पराभव केला. पण त्यानंतर त्याला पुढील सामन्यात ऑस्ट्रियाच्या थियेमकडून हार पत्करावी लागली होती. या स्पर्धेत नदालने यापूर्वी दोन वेळा अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आह
गुरुवारी झालेल्या या स्पर्धेतील आणखी एका सामन्यात ऑस्ट्रियाच्या थियेमला रशियाच्या रुबलेव्हकडून 6-2, 7-5 असा पराभव स्वीकारावा लागला. मात्र त्याने याआधीच उपांत्य फेरी गाठलेली आहे. टोकियो गटातून रशियाचा चौथा मानांकित मेदव्हेदेवने आपले अग्रस्थान कायम राखले असून त्याचा उपांत्यफेरीचा सामना नदालशी होणार आहे. लंडनमध्ये एटीपी टूरवरील ही वर्षअखेरीची शेवटची अंतिम स्पर्धा आतापर्यंत सलग बारा वर्षे नियमितपणे खेळविली जात असून आता पुढील वषी सदर स्पर्धा इटलीतील टय़ुरीनमध्ये घेतली जाणार आहे.









