जगात सर्वप्रथम लस निर्मिती केल्याचा दावा करणाऱया रशियात लसीकरण कार्यक्रम सुरू केला जाणार असून याकरता तेथे एक इशारा देण्यात आला आहे. रशियाच्या आरोग्य अधिकाऱयांनी स्पुतनिक-5 लस घेणाऱयांना पुढील दोन महिन्यांर्पंत मद्यपान न करण्याचा सल्ला दिला आहे. रशियन लस स्पुतनिक-5चे दोन डोस 21-21 दिवसांनी अंतराने दिले जाणार आहेत.
लोकांनी किमान 42 दिवसांपर्यंत ही खबरदारी बाळगावी. अल्कोहोलचे सेवन बंद करावे. इम्युनिटी वाढविण्यापासून रोखणारी इम्यूनोसप्रेसेंट औषधे घेऊ नयेत, असे आवाहन रशियाचे उपपंतप्रधान टाटियाना गोलिकोवा यांनी केले आहे.
लसीचे दोन्ही डोस घेण्यादरम्यान 42 दिवसांपर्यंत अल्कोहोलचे सेवन थांबवावे. सुदृढ प्रकृती आणि लसीचा इम्यून रिस्पॉन्स उत्तम हवा असल्यास मद्यपान बंद करावे लागणार असल्याचे रशियाच्या ग्राहकसुरक्षा विभागाच्या प्रमुख ऍना पोपोवा यांनी म्हटले आहे.
स्पुतनिक-5 लस तयार करणाऱया अलेक्झेंडर गिंट्सबर्ग यांचे विधान मात्र सरकारच्या आवाहनाच्या उलट आहे. एक ग्लास शॅम्पेन तुम्हाला तसेच इम्यून सिस्टीमला त्रास देणार नाही, असे अलेक्झेंडर यांनी समाजमाध्यमांवर नमूद केले आहे. डोस घेण्याच्या 3 दिवसपूर्वी आणि नंतर 3 दिवसांपर्यंत मद्यपान करू नका, हा सल्ला प्रत्येक लसीवर लागू होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
लोकांमध्ये संताप
रशियात व्यापक स्तरावर लसीकरणाची तयारी सुरू आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार मद्यपानाप्रकरणी रशिया जगात चौथ्या क्रमांकावर आहे. तेथील नागरिक वर्षभरात 15 लिटर मद्य रिचवतो. सरकारच्या नव्या इशाऱयानंतर रशियात संताप पसरला आहे. मद्यापासून दूर राहणेच त्रासदायक आहे, सणासुदीच्या काळात मद्यपान त्यागण्याचा तणाव लसीच्या दुष्परिणामापेक्षाही वाईट ठरणार असल्याची प्रतिक्रिया मॉस्कोच्या रहिवासी एलेना क्रीवेन यांनी व्यक्त केली आहे.









