क्रॉस-कंट्री पर्वतीय मॅरेथॉनमध्ये 21 स्पर्धकांनी गमावला होता जीव
ऑनलाईन टीम / बीजिंग :
चीनच्या उत्तर-पश्चिम भागामध्ये खराब हवामानामुळे 100 किलोमीटर ‘क्रॉस-कंट्री पर्वतीय मॅरेथॉन’मध्ये सहभागी झालेल्या 21 स्पर्धकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. याप्रकरणी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह 27 जणांना शिक्षा होणार आहे.
22 मे रोजी चीनच्या गांसु प्रांतात पर्यटन स्थळ असलेल्या ‘यल्लो रिव्हर स्टोन’ फॉरेस्टमध्ये आयोजित 100 किलोमीटर क्रॉस-कंट्री पर्वतीय मॅरेथॉनमध्ये 172 जण सहभागी झाले होते. दरम्यान, मॅरेथॉन मार्गावरील उंच भागातील 20 ते 31 किमी अंतरादरम्यानचे हवामान खराब झाले.
या स्पर्धेदरम्यान स्पर्धकांना वेगवान वारे आणि हिम वर्षावाचा सामना करावा लागला. तापमान अचानकपणे कमी झाल्याने अनेक स्पर्धकांना त्रास झाला होता. काही जण बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्यावर ही स्पर्धा थांबविण्यात आली होती.
या स्पर्धेतील 172 स्पर्धकांपैकी 143 जण सुरक्षित होते. 8 जण किरकोळ जखमी झाले होते. तर 21 स्पर्धक दगावले. या घटनेनंतर स्पर्धेचे आयोजक म्हणून बैयिनमध्ये सत्तारुढ सीपीसीचे सचिव सू जून आणि महापौरांवर यापूर्वीच दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.