विविध स्वरुपाच्या नफ्यामध्ये नोंदवली वाढ
मुंबई
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून ओळख असणाऱया भारतीय स्टेट बँक (एसबीआय) यांनी आपला तिमाही अहवाल नुकताच सादर केला आहे. यामध्ये जून तिमाहीत बँकेचा नफा 55 टक्क्यांनी वाढून 6,504 कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. हाच आकडा मागच्या वर्षी समान तिमाहीत 4,189.34 कोटी रुपये होता. म्हणजे वर्षाच्या आधारे हा नफा 55.25 टक्क्यांनी वाढला आहे.
एक्सचेंज फायलिंगच्या आधारे बँकेचे ऑपरेटिंग प्रॉफिट 5 टक्क्यांनी वाढून 18,975 कोटी रुपये राहिले आहे, जे वर्षाच्या आधी 18,061 कोटी इतके होते. बँकेची व्याजातून कमाई 3.74 टक्क्यांनी वाढली असून जून तिमाहीत 27,638 कोटी रुपयावर राहिली आहे. यासोबत अन्य उत्पन्नामध्येही वाढ झालेली आहे.
बँकेचे समभाग विक्रमी टप्प्यावर
बीएसईवर एसबीआयचे समभाग 3.57 टक्क्यांनी वाढून 462.40 रुपयावर राहिले आहेत. टेडिंगच्या दरम्यान समभाग 463.55 रुपयांवर पोहोचले आहेत. याच आकडेवारीने नवा विक्रम नोंदवला आहे.









