वृत्तसंस्था/ मेलबोर्न
ऑस्ट्रेलियन क्रिकेट क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱया क्रिकेटपटूंचा क्रिकेट आस्ट्रेलियातर्फे प्रत्येकी वर्षी गौरव केला जातो. 2020-21 कालावधीसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ तसेच महिला क्रिकेटपटू बेथ मुनी यांची सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवड केली आहे. स्टीव्ह स्मिथला ऍलन बोर्डर पदक तर मुनीला बेलींडा क्लार्क पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. स्टीव्ह स्मिथने ऍलन बॉर्डर पदक आतापर्यंत तीनवेळा पटकाविले आहे तर मुनीने पहिल्यांदाच बेलींडा क्लार्क पुरस्कार मिळविला आहे.
2020-21 क्रिकेट हंगामात ऑस्ट्रेलियन पुरूष आणि महिला क्रिकेटपटूंच्या कामगिरीचा आढावा घेवून या पुरस्कारासाठी मतदान प्रक्रियेने क्रिकेटपटूंची निवड करण्यात आली आहे. भारताविरूद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत स्मिथची कामगिरी चांगली झाली नाही. तरी पण क्रिकेट ऑस्ट्रेलियातर्फे स्मिथची ऍलन बॉर्डर पदकासाठी निवड करून अनपेक्षित धक्का दिला. स्टीव्ह स्मिथने 2020-21 च्या क्रिकेट हंगामातील वनडे प्रकारात सर्वोत्तम क्रिकेटपटूंचा पुरस्कारही यापूर्वी मिळविला आहे. या पुरस्काराच्या शर्यतीमध्ये 28 मतासह स्मिथ पहिल्या, फिंच 23 मतासह दुसऱया आणि झंपा 19 मतासह तिसऱया स्थानावर राहिले.
माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने 63.11 धावांच्या सरासरीने 568 धावा जमविल्या असून त्याने बेंगळूरमध्ये शतक आणि सिडनी मैदानावर शतक झळकविले होते. क्रिकेट ऑस्ट्रेलियातर्फे 2020-21 च्या क्रिकेट हंगामात ऍगेरची टी-20 प्रकारातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवड झाली आहे,. ऍगेरने झंपा आणि फिंच यांना मागे टाकले. गेल्यावर्षी ऍलन बॉर्डर पदक सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरने पटकाविले होते तसेच महिला विभागात इलेसी पेरीने बेलिंडा क्लार्क पुरस्कार मिळविला होता.
स्टीव्ह स्मिथने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात 2020-21 च्या कालावधीत 45.75 धावांच्या सरासरीने 1098 धावा जमविल्या. भारताविरूद्धच्या मालिकामध्ये स्मिथने 4 शतके आणि 4 अर्धशतके नोंदविली. स्मिथची वनडे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली. स्मिथने 126, कमिन्सने 117 तर फिंचने 97 मते मिळविली.
महिलांच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीने 60 मते मिळविली. लेनिंगने 58 मते तर वॉरहेमने 50 मते घेतली. 2002 साली क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या पुरस्काराला प्रारंभ केला होता. 27 वर्षीय मुनी बेलिंडा क्लार्क पुरस्कार मिळविणारी नववी ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू आहे. मुनीने टी-20 प्रकारात 2020-21 कालावधीत सर्वोत्तम महिला क्रिकेपटूचा पुरस्कार घेतला आहे. त्याचप्रमाणे कसोटी क्रिकेटमध्ये पॅट कमिन्सने 2020-21 च्या कालावधीत सर्वोत्तम ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळविला आहे.









