गृहसजावटीत नवनव्या ट्रेंडसची भर पडत असते. सजावटीला नवा आयाम देणाऱया गोष्टी आपले अस्तित्व अधिक अधोरेखीत करण्याचा प्रयत्न करत असतात. वेगवेगळी माध्यमे सजावटीला हातभार लावत असतात. यातच आता भर पडली आहे ती स्टीलची. स्टीलच्या वापरातून अनेकविध गृहसजावटीच्या वस्तु बनवल्या जात आहेत. ज्यांचा वापर केल्याने सजावटीला एक वेगळी झळाळी मिळू पाहते आहे.
स्टीलचा वापर आजवर बांधकाम साहित्याच्याबाबतीत केलेला आपण पाहिलेला आहे. याशिवाय रोजच्या नित्याच्या वस्तु जसे की भांडी वगैरे आपण स्टीलचीच जास्तीत जास्त वापरतो. त्यापलिकडे जाऊन आता स्टीलचा वापर सजावटीला चकाकी आणण्यासाठी केला जातोय. महत्त्वाचे म्हणजे स्टीलच्या देखभालीसाठी जास्त श्रम घ्यावे लागत नाहीत शिवाय बजेटमध्येही स्टीलच्या वस्तु खरेदी करता येतात.
धातुचे महत्त्व गृहसजावटीत फार पूर्वीपासूनच टिकून आहे. फक्त ते अवजड आणि देखभालीसाठी कटकटीचं असल्याने त्याचा विचार फारसा केला जात नाही. नैसर्गिक पोत शिवाय वेगवेगळय़ा शैलींमुळे धातुचा वापर वेगळेपण दाखवून देत असतो. असाच गुणधर्म असणाऱया स्टीलचा वापर खिडक्या, कॅबिनेट, प्रेम्स, बेंच आणि शिल्पाच्या माध्यमातून वेगळय़ा अंगाने केला जातोय. कमी खर्चिक, चकाकी, कमी देखभाल या तीन फायद्यामुळे याचा वापर वाढतो आहे. क्लासिक आणि कल्पक डिझाइन्सची यात पडणारी भर सजावटीला वेगळा आयाम देत असतात. हाच प्रयत्न आजचे इंटिरीअर डिझाइनर्स आपल्या सजावटीच्या माध्यमातून करताना दिसतात. बांधकामात वापरलं जाणारं हे मटेरियल आता सजावटीला चारचाँद लावण्यासाठी वापरलं जातंय. आधुनिक युगातील सजावटीत आणखी भर घालणाऱया स्टीलला आज लिव्हिंगरूमसह विविध खोल्यांमध्ये मिरर (आरसा), बुककेसेस, अप्लायन्सेस आणि आऊटडोअर फर्निचरच्या माध्यमातून वापरण्याला प्राधान्य देण्याचा स्तुत्य प्रयत्न होतोय. लक्झरी घरांच्या दुनियेत माइल्ड स्टीलचा वापर केला जातो. ग्लेझड फिनीशच्या टचमुळे घर अधिक उठावदार होते. स्टेनलेस स्टीलचा वापर वॉल टाइल्स, स्टेअर्स (जिना), मॉडय़ुलर किचन आणि फर्निचर यामध्ये केला जातो. आपल्या घराच्या सजावटीला ग्लॅमर मिळवून द्यायचं असेल तर स्टीलचा वापर उपयुक्त ठरू शकतो. हाताची खुर्ची, टेबल, शँडेलियर असो किंवा मग जिना या सर्वात स्टीलचा वापर करता येतो.
रंगीत स्टीलची अप्लायन्सेस घरात लक्ष वेधून घेतात.
स्लीक डायनिंग चेअर्स स्टीलच्या घेतल्यास त्या जागेचीच चमक उठून दिसते.
लिव्हिंगरूमध्ये स्टीलचे साइड टेबल घेता येते.
स्टील प्रेमचे सुंदर आरसे खूप छान फील निर्माण करतात.
वॉल माऊंटेड बुककेसही स्टीलचे घेतल्यास त्य़ावर बुक्स किंवा सजावटी वस्तु ठेवता येतील.
घराबाहेर असणारे फर्निचर स्टीलचे घेण्याला प्राधान्य देण्यात येतं. पारंपरिक शैलीचं आऊटडोअर फर्निचर वातावरण फुलवण्यास मदत करतं.
अशा पद्धतीने स्टीलच्या वापराने आपल्या गृहसजावटीला हटके अंदाजात पेश करता येतं. एक परवडणारं, उठावदार असं हे स्टीलचं माध्यम कुणालाही आपल्या सजावटीत सामावून घेता येतं.