सध्या भारतात स्टार्टअप कंपन्यांची भरभराट होताना दिसत आहे. 2022 मध्ये अशा 150 नव्या युनिकॉर्न कंपन्या स्थापन होतील अशी शक्यता आहे. भविष्यकाळात अर्थव्यवस्थेचे सारथ्य याच कंपन्या करतील अशी शक्यता व्यक्त होत आहे. भारत जगात लोकसंख्येच्या संदर्भात दुसऱया क्रमांकावर असून या वाढत्या लोकसंख्येला रोजगाच्या संधी उपलब्ध करुन देणे, हे आव्हान आहे.
स्टार्टअप कंपन्या काही प्रमाणात तरी हे आव्हान स्वीकारु शकतील अशी शक्यता आहे. बऱयाच अशा कंपन्या नव्या तंत्रज्ञानावर आधारित असल्याने आणि नव्या संकल्पना घेऊन आलेल्या असल्याने लोकप्रिय होत आहेत. विशेषतः ग्राहकांना मागणीनुसार घरबसल्या पुरवठा करणाऱया कंपन्यांची सध्या चलती असल्याचे दिसून येते. उत्पादन आणि सेवा या दोन्ही क्षेत्रांमध्ये या कंपन्या स्पृहणीय कामगिरी करत असल्याचे दिसून येते.
केंद्र सरकारने कौशल्य विकासाला प्राधान्य देण्याच्या धोरणाचाही लाभ या कंपन्यांना होत आहे. कौशल्य विकास योजनेतून प्रशिक्षण घेतलेल्या अनेक युवकांनी अशा छोटय़ा कंपन्या सुरु केल्या असून त्यांची कामगिरी चांगली होत असल्याचे दिसते असे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले आहे.









