सौरऊर्जेच्या पथदिपांची लागली वाट, कोटय़वधी निधी गेला पाण्यात, 15 वर्षांत वाताहत, अधिकारी-कर्मचाऱयांचेही दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
विजेचा अपव्यय टाळण्यासाठी आणि सर्वसामान्यांना सौरऊर्जेचा वापर करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल आणि बिम्सच्या जागेत सौरऊर्जेचा प्रकल्प राबविण्यात आला. 2005 साली प्रकल्पाला सुरुवात झाली. दरम्यान, येथे कोटय़वधी रुपये खर्च करून बिम्स आणि सिव्हिल प्रशासनाने सौरऊर्जेचे पथदीप लावले. मात्र, काही महिन्यांतच हा प्रकल्प कुचकामी ठरला. यामधील असणारे पथदीप निकृष्ट दर्जाचे असल्याने कोटय़वधी रुपये पाण्यात गेले आहेत. एकीकडे अत्याधुनिक यंत्रणेसाठी बिम्स हॉस्पिटल प्रयत्न करत असताना सौरऊर्जेचा प्रकल्प बंद पडला आहे. आता यासाठी पुन्हा कोटय़वधी रुपये खर्च करण्यात येतील. मात्र, जे जुने आहे तेच सुस्थितीत ठेवल्यास पैसा वाया जाणार नाही, याची फिकीर ना येथील अधिकाऱयांना आहे ना प्रशासनाला. त्यामुळे सौरऊर्जेचा प्रकल्प बिम्स प्रशासनाने ढापल्याचे निदर्शनास आले आहे.
या प्रकल्पाकडे सोयीस्कर लक्ष व त्याची काळजी घेण्यात आली नसल्याने हा सर्व खर्च पाण्यात गेला आहे. या सौरऊर्जेच्या पथदिपांसाठी वापरण्यात आलेल्या बॉक्समधील बॅटऱयाही अज्ञातांनी चोरी केल्या आहेत. यामुळे सध्या हा उपक्रम केवळ फार्स ठरल्याचेच दिसून येत आहे. बिम्स, सिव्हिल हॉस्पिटल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डन रस्त्यासह परिसर तब्बल 25 एकर जागेत आहे. या जागेत बिम्स आणि सिव्हिल हॉस्पिटलला अधिक महत्त्व देण्यात येते. येथे सौरऊर्जेवरील पथदीपांची उभारणी केली आहे.
तब्बल 25 एकर जागेत 200 पथदीप बसविण्यात आले आहेत. 2005 साली बिम्सला सुरुवात झाली. त्यानंतर काही कालावधीत येथे पथदीप बसविण्याच्या कामाला गती देण्यात आली. एका पथदिपाला तब्बल 74 हजार रुपये खर्च अपेक्षित होता. हा सर्व निधी राज्य शासनाकडून देण्यात आला होता. मात्र, याचा योग्य विनियोग न झाल्याने आणि पथदिपांची काळजी न घेतल्याने हा सर्व निधी वाया गेला आहे. पथदीप बसविल्याने सिव्हिल हॉस्पिटल व परिसर झगमगून गेला. हे पथदीप तब्बल 2 ते 4 महिने सुरळीत चालले. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतर हे पथदीप बंद पडत गेले. याची वेळीच काळजी घेण्याची गरज होती. मात्र, दुर्लक्ष करण्यात आले.
बॅटरी आणि पॅनेलचीही चोरी
सौरऊर्जेसाठी येथे बॉक्स करून त्यामध्ये बॅटरी बसविण्यात आली होती. त्याबरोबरच सौरऊर्जा बॅटरीत सामाविष्ट करण्यासाठी पॅनेलही बसविण्यात आले होते. मात्र जसजसे हे दिवे बंद पडत गेल्याने येथील बॅटरी आणि पॅनेलही चोरी करण्यात आले आहेत. ही चोरी सुरक्षारक्षकांनीच केली असावी, असा संशयही व्यक्त होत आहे. परिणामी हा घोळ साऱयांना स्मरणातही नाही. याचा विसर आता प्रशासनालाही पडला आहे. कारण एकही पथदीप तेथे नाही. उलट नवीन पथदीप बसविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. वीजटंचाईमुळे सोलार दिवे बसविण्यात येत आहेत.
सिव्हिल हॉस्पिटलमध्येही विजेची बचत आणि खर्च कमी करण्यासाठी आवारात सोलार दिवे बसविण्यात आले. मात्र, काही दिवसांतच हे दिवे बंद पडले आहेत. या दिव्यांच्या खांबांना असलेल्या बॅटऱयाही चोरीला गेल्या आहेत. यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमधील सोलार दिव्यांची योजना पूर्णपणे अपयशी ठरली आहे. राज्य सरकारने हे काम बेंगळूर येथील वेलनेट नॉन कन्व्हेंशनल एनर्जी सिस्टम या कंपनीकडून करून घेतले होते. त्यावेळी तब्बल एका पथदीपाला दोन वर्षांची वॉरंटीही देण्यात आली होती. मात्र, तिसऱया महिन्यातच या पथदीपांना उतरती कळा लागली. सिव्हिल हॉस्पिटलमधील आवारात बिम्सपासून क्लब रोडकडील सोलार दिवे उभे करण्यात आले. 2011 साली याचे उद्घाटन केले होते. त्यावेळी बिम्सचे संचालक एम. चंद्रशेखर यांनी सोलार पथदिपांचे अनावरण केले होते.
तीन महिन्यांतच सौरदिवे बंद
घरगुती, व्यावसायिक उपयोगाबरोबरच शैक्षणिक संस्था व उद्योजकही या योजनेचा लाभ घेऊ शकतात, असे सांगत आहेत. मात्र, शासनानेच याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. सिव्हिल हॉस्पिटल, बिम्स व या भागात लावण्यात आलेले सोलार दिवे बंद पडले आहेत. एकदा सोलार पॅनेल बसवून घेतल्यानंतर त्याची 25 वर्षांची गॅरंटी देण्यात येणार असून इन्व्हर्टरसाठी पाच वर्षांची गॅरंटी सरकारने दिली असली तरी सिव्हिल हॉस्पिटलमधील कारभार पाहता केवळ तीनच महिन्यात येथील सौरदिवे बंद पडले आहेत. यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.









