वृत्तसंस्था/ कोलंबो
पाकचा वेगवान गोलंदाज सोहेल तन्वीर आणि कॅनडाचा फलंदाज रविंद्रपाल सिंग यांना कोरोनाची बाधा झाल्याने येथे होणाऱया पहिल्या लंकन प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धेला मोठा धक्का बसला आहे. सदर स्पर्धा 26 नोव्हेंबरपासून खेळविली जाणार आहे.
पाकचा गोलंदाज सोहेल तन्वीर हा कँडी टस्कर्स संघाचे प्रतिनिधित्व करीत असून कॅनडाचा फलंदाज रविंद्रपाल सिंग कोलंबो किंग्जचे प्रतिनिधित्व करीत आहे. शुक्रवारी या दोन्ही क्रिकेटपटूंची कोरोना चाचणी घेण्यात आली आणि ते पॉझिटिव्ह असल्याचे या दोन्ही संघांच्या फ्रँचायजींनी सांगितले. लंकेमध्ये ही पहिलीच प्रिमियर लिग टी-20 स्पर्धा घेतली जात असून स्पर्धा आयोजकांना कोरोनाची समस्या चांगलीच भेडसावत आहे. या स्पर्धेत सुरुवातीला पाकचा वहाब रियाज आणि इंग्लंडचा प्लंकेट सहभागी होणार होते. पण शेवटच्या क्षणी त्यांनी या स्पर्धेतून माघार घेतल्याने पाकच्या सोहेल तन्वीरला बदली खेळाडू म्हणून निवडण्यात आले होते. कोरोनाची बाधा झाल्याने आता सोहेल तन्वीर आणि रविंद्रपाल सिंग यांना किमान दोन आठवडय़ांच्या कालावधीसाठी क्रिकेटपासून अलिप्त रहावे लागेल. हसन तिलकरत्ने कँडी टस्कर्सचे प्रशिक्षक आहेत. या स्पर्धेत लंकेचा मलिंगा, विंडीजचा ख्रिस गेल तसेच भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण हे सहभागी होणार आहेत. पण गेल व मलिंगा यांनी माघार घेतली असल्याचे स्पर्धा आयोजकांनी सांगितले.









