झोपडीत कडक उन्हाचे चांदणे : गरीब, मध्यमवर्गीयांचे हाल
प्रतिनिधी/ सातारा
कोरोना विषाणू संसर्गाने जगातील सर्व मानवजातीला वेठीस धरले आहे. कोटय़वधी रुपये खर्च करुन सर्व देश संशोधक पोसतात मात्र त्यांचाही काही उपयोग अद्याप झालेला नाही कारण कोणत्याही देशाच्या संशोधकांनी लस शोधण्यात यश मिळवलेले नाही फक्त प्रयत्न सुरु आहे. देशात लॉकडाऊन वाढला तसा जिल्हा रेड झोनमध्ये असल्याने जिल्हय़ात वाढला. प्रतिबंधित केलेल्या भागात तर कडक लॉकडाऊन सुरु आहे. मात्र भर उन्हात झोपडीत कडक चांदणे फुलतेय तर मध्यमवर्गींयांची अवस्था धड सोसताही येईना अन सांगताही येईना अशी झालीय.
सातारा व कराडमध्ये बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्याचे आव्हान या दोन्ही शहर व तालुक्यांसमोर आहे. जावली निसटली आहे तर इतर तालुक्यांना कोरोनाची फारशी झळ बसलेली नाही. जिल्हय़ात कराड तालुका जोरावर असल्याने दिवसेंदिवस तिथे बाधितांची वाढणारी संख्या सगळय़ांच्या जीवाला घोर लावत आहे. दोन लॉकडाऊननंतर ही स्थिती असून आता तिसऱया लॉकडाऊन सत्रात प्रवेश करताना सातारा व कराड येथे सुरु असलेला कडक लॉकडाऊन भर कडक उन्हात सगळय़ांचा घाम काढत आहे.
जिल्हाधिकाऱयांनी सातारा व कराड येथे ज्या ज्या भागात बाधित रुग्ण आढळून आले तो परिसरात प्रतिबंधित झोन केला आहे. त्यामुळे तिथे अत्यावश्यक सेवा मिळणेही दुरापास्त होवून बसले आहे. लोकांना वाटले की 3 मे पर्यंत ही स्थिती राहील व नंतर काही प्रमाणात तरी ढील मिळेल पण तसे न झाल्याने नागरिकांच्या जगण्याचे अनेक प्रश्न निर्माण होवू पहात आहेत. यामध्ये गरीब, मजूर, कामगारांसह खासगी नोकऱया करणारे मध्यमवर्गीयांचे प्रचंड हाल सुरु आहेत. मात्र केवळ कोरोना गेला पाहिजे म्हणून नागरिक प्रशासनाला सहकार्य करत आहेत.
गरिबांपर्यंत खऱया अर्थाने मदत पोहोचण्याची गरज असताना ती पोहोचत नसल्याचे प्रकार समोर येत आहेत. तर मध्यमवर्गीय नोकरदार घरीच असल्याने काहींचे पगारही न झाल्याने त्यांच्यासमोर आर्थिक अडचणी उभ्या आहेत. दुसरीकडे किराणा, दूध, भाजीसह या अत्यावश्यक सेवा बंद असल्याने घरातील शिल्लक साहित्यावर जगण्याचा प्रयत्न सुरु आहे. कोरोनाच्या संकटापासून वाचायचे असेल तर हे करावेच लागणार असल्याची समजूत काढून नागरिक घरात बसत असले तरी त्यांना जगण्यासाठी ज्या वस्तू लागतात तेवढय़ातरी उपलब्ध करुन देण्याचे आव्हान प्रशासनासमोर निश्चितपणे आहे.
दुकाने सुरु होण्याच्या वृत्ताने गर्दी
लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु झाल्यावर त्यात काही अंशी दुकाने सुरु राहणार असल्याचे वृत्त दूरवाहिन्यावर दाखवण्यात येत होते. त्यामुळे साताऱयातही दुकाने सुरु होतील या आशाने नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केली होती. मात्र तसा कोणताही आदेश नसल्याने कोणत्याही प्रकारची दुकाने सुरु नव्हती. त्यामुळे नागरिकांचा भ्रमनिरास झाला तर आता दुकाने सुरु होणार ही अफवा चांगलीच पसरत चालली होती त्यामुळे नेमके काय याबाबत दुकानदारांसह नागरिकांकडून विचारणा होत होती.
उन्हाचा कडाका अन स्तब्ध रस्ते
सातारा शहरात प्रतापसिंह हायस्कूलसमोरील गार्डन सिटी परिसराला लागून असलेला सर्व परिसर सील करण्यात आला आहे. त्यामुळे महत्वाचा राधिका रोड बॅरिकेटस व बांबू लावून अडवण्यात आल्याने तो वाहतुकीसाठी बंद असल्याने मोठी गैरसोय होत आहे. त्यातच कडक उन्हाने आता अंगाची लाही लाही होवू लागली असून भर दुपारी फक्त नीरव शांतता अन स्तब्ध रस्ते आणि घरात बसलेले नागरिक उन्हासह कोरानाच्या झळा सोसत आहेत. यापुढे लॉकडाऊन शिथील केला तरी सोशल डिस्टन्स पाळून सर्व व्यवहार करावे लागणार आहेत याचे भान ठेवावे लागणार असून प्रशासनाकडून तशा पध्दतीने शिथीलता आणण्याबाबत विचार सुरु असल्याचे कळते.
बाधितांमध्ये स्थानिक कोणी नाही
सातारा शहर सध्या प्रतिबंधित घोषित करण्यात आले असले तरी ज्यांना कोरोनाची बाधा झालीय त्यामध्ये दोन महिला आरोग्य विभागाशी संबंधित आहेत. तर प्रतापगंज पेठेतील बाधित मुळाचा सातारचा असला तरी तो इथे रहात नाही. मुंबईहून येताना तो बाधित होवून साताऱयात आलाय तर चार कैदी हे पुणे जिल्हय़ातून आलेली देणगी आहे. मात्र या सर्वांचा फटका सातारा शहरासह उपनगरांना बसला असून नागरिकांना कडक लॉकडाऊन पाळण्याची वेळ आली आहे.
शिथिलता दिली तरी शिस्त आवश्यक
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी साताऱयात एप्रिल महिन्यात काही वेळ सवलतही दिली होती. मंडई बंद झाली तरी फिरते विक्रेते सेवा पुरवत होते. किराणा दुकानेही सुरु होती. तर दूधासह, पेट्रोल, डिझेलही मिळत होते. मात्र या काळात काही सातारकरांचा मुर्खपणा सुरु होता. घरात बसण्याऐवजी वॉकिंगची त्यांना घाई होती तर सवलतीच्या काळात काहीजण तर उगीचच बाहेर पडून पोलीस खात्यावरील ताण वाढवत होते. आता जरी शिथिलता दिली तरी नागरिकांना यापुढे मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स पाळणे, स्वच्छता राखण्याची काळजी घ्यावीच लागणार आहे अन्यथा कोरोना पाठ सोडणार नाही मग लॉकडाऊनही पाठ सोडणार नाही.
बाहेरुन येणाऱया लोकांना आवरा
काहीजण मुंबई व पुण्याहून सातारा जिल्हयात प्रवेश करत आहेत. ज्यांच्याबद्दल माहिती कळते त्यांना आवश्यकतेनुसार होम क्वारंटाईन, संस्थात्मक क्वारंटाईन करुन ठेवण्यात येत आहे. बाहेरुन नागरिक येतातच कसे असा सवाल आहे. जिल्हाबंदी असताना येणाऱया नागरिकांवर गुन्हे दाखल होत असले तरी हा प्रकार थांबण्याची गरज आहे. मुंबईची अवस्था पाहून मुंबईकरांची मस्ती कमी झालीय. सातारा व कराड सोडले तर जिल्हय़ात बरे वातावरण आहे. जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी बाहेरुन येणाऱयांना आवरावे लागणार आहे.








