प्रतिनिधी / वैराग
मुंगशी (वा ) ता. बार्शी येथील नागझरी नदीच्या पुरात वाहून गेलेल्या शेतकरी निवृत्ती रंगनाथ ताटे यांच्या कुटुंबीयांची महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण मंडळाचे माजी अध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी भेट देऊन २५००० हजार रूपाची आर्थिक मदत केली. घटना घडून पाच दिवस लोटले तरीही नुकसानीच्या पंचनाम्यासाठी शासनाचा अधिकारी वा कर्मचारी गावास फिरकला नसल्याची समस्या ग्रामस्थांनी मांडल्या.
रविवारी मिरगणे यांनी बार्शी तालुक्यातील वैराग, पिंपरी, तडवळे, दहिटणे, मुंगशी (वा ), साकत, काळेगाव, मालेगाव, घाणेगाव आदी गावांना भेटी देऊन नुकसानीची पहाणी केली. ग्रामस्थांच्या अडचणी व समस्या जाणून घेत राज्याचे मुख्य सचिव संजीवकुमार, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, गटविकास अधिकारी शेखर सावंत आदींना मुंगशी ग्रामस्थांच्या नुकसानीची माहीती दिली. शिवाय पाच दिवस होऊनही शासकिय यंत्रनेकडून पहाणी अथवा नुकसानीचे पंचनामे होत नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी मांडल्या.
तालुक्यात द्राक्षबागा पडून नुकसान झाले. शिवाय पुरात वाहून गेलेल्या शेतकरी निवृत्ती रंगनाथ ताटे यांच्या कुटुंबीयांना यांनी आर्थीक मदतीचा धनादेश संगिता बापूराव क्षीरसागर यांना दिला. यावेळी बाळासाहेब पवार, शिक्षक नेते श्रीधर गोरे, अॅड. जीवनदत्त आरगडे,अविनाश शिंदे, राजाभाऊ गायकवाड, रामेश्वर स्वामी, रविंद्र सांगुळे, संभाजी आरगडे आदीसह मुंगशीचे शेतकरी, ग्रामस्थ उपस्थितीत होते.