प्रतिनिधी / करमाळा
करमाळा तालुक्यातील विहाळ येथील भैरवनाथ शुगरने 2018- 19 मध्ये अनेक शेतकऱ्यांची 266 रुपयेप्रमाणे अंतिम बिल दिले नाही. त्याबरोबर अनेक वाहनधारकांच्या नावावर त्यांच्या परस्पर काढलेले कर्जप्रकरणी कारखान्याची चौकशी व्हावी व शेअरच्या रकमा परत मिळाव्यात या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या वतीने येत्या शुक्रवारी (ता. 24) करमाळा तहसील कचेरीसमोर लाक्षणिक उपोषण व आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली आहे.
चिवटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत निवेदन पाठवले होते. या निवेदनात त्यांनी म्हटले की, भैरवनाथ शुगरने 2018- 19 मध्ये उसाला दोन हजार 200 रुपये भाव देतो असे आश्वासन दिले होते. गाळप सुरू झाल्यानंतर दोन महिने उसाला दोन हजार 200 रुपये भाव दिला. मात्र नंतर शेतकऱ्यांना पैसे देण्यास टाळाटाळ सुरु केली. अजूनही जवळपास दीड लाख मेट्रिक टन उसाचे प्रति टन 266 रुपयाने पैसे काढून ठेवले आहेत. या पैशाला दोन वर्षे उलटून गेली तरी कारखाना प्रशासन शेतकऱ्याला दाद देत नाही. कारखान्याचे चेअरमन शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत हे शेतकऱ्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ करत आहेत. या कारखान्याने अनेक वाहनधारकांच्या नावावर शेतकर्यांच्या परस्पर लाखो रुपयांचे कर्ज काढले आहे. हे कर्ज थकीत झाल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांच्या सातबारा उतारावर बँकेचे नाव लागले आहे.
त्याचप्रमाणे गेली दहा वर्षापासून शेअर्स म्हणून प्रत्येकी शेतकऱ्याकडून वीस हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत. या रकमेला हा कारखाना व्याज देत नाही किंवा लाभांश देत नाही व ही रक्कम परत मागण्यास गेल्यास शेतकऱ्याला हुसकून लावले जाते. या सर्व प्रकरणाची चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय मिळावा. यासाठी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने हे आंदोलन करीत असल्याचे या पत्रात चिवटे यांनी म्हटले आहे.
आमदार तानाजी सावंत यांनी एक तर शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत किंवा या सर्व प्रश्नांचा खुलासा उद्धव साहेब ठाकरे यांच्यापुढे मांडावा अशी मागणी शेतकर्यांतून होत आहे. सातत्याने साखर उतारा कमी दाखवून एफआरपी कमी काढायची व शेतकऱ्यांचा ऊस कवडीमोल भावाने खरेदी करायचा असा प्रकार सातत्याने या कारखान्यातून होत आहे. याचीही चौकशी साखर आयुक्त पुणे यांनी करावी, अशी मागणी चिवटे यांनी केली आहे.
Previous Articleबाबुल सुप्रियो तृणमूलमध्ये दाखल
Next Article शहरी भागात वॉर्डनिहाय लसीकरण









