प्रतिनिधी / सोलापूर
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सर्व शिक्षण संस्थेतील शिक्षक-कर्मचारी यांना दिवाळीची सुट्टी जाहीर केली आहे. असे असताना महापालिकेच्या शिक्षण विभागातील शिक्षकांना सुट्टी देण्यात आली नाही. त्यामूळे महापालिकेच्या या विरोधी धोरणाबाबत जितेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी महापालिकेत घोषणाबाजी करत दिवाळी सुट्टी मिळण्याची मागणी केली.
यावेळी शिक्षक म्हणाले, महापालिकेच्या शिक्षण विभागातील सर्व शिक्षक हे कोरोनाच्या सुरवातीच्या काळापासून सर्व्हेक्षणासाठी कार्यरत आहेत. आतापर्यंत तीन वेळा ड्यूटी बजावली आहे. याबरोबरच शाळेचे ऑनलाइन कामही सांभाळले आहे. ऐन पावसातही राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले आहे. तरी कोविड कामातूनही मुक्त करा आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सर्व शिक्षण संस्थेतील शिक्षक-कर्मचारी यांना दिवाळीची सुट्टी जाहीर केली आहे, त्याप्रमाणे महापालिकेच्या शिक्षण विभागातील शिक्षकांना देखील मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी सुट्टी जाहीर करावी, असे मत यावेळी शिक्षकांनी व्यक्त केले.









