प्रतिनिधी / करमाळा
कुकडी धरण साखळीमध्ये सध्या समाधान कारक पाऊस पडत असल्यामुळे कुकडीच्या सर्व धरणामध्ये जवळपास 50 टक्केच्या आसपास पाणीसाठा आहे. त्यामुळे कुकडीचे पाणी करमाळा तालुक्यातील लाभक्षेत्रातील गावांना सोडण्याची मागणी आ.संजयमामा शिंदे यांनी जलसंपदामंत्री ना. जयंतराव पाटील यांच्याकडे केली आहे.
याबाबत प्रसिद्धीला दिलेल्या पत्रात ते म्हणतात की, माझे करमाळा मतदार संघामध्ये चालू वर्षी समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे खरीप पिकांना पाणी आवश्यक आहे. अन्यथा पिके पाण्याअभावी जळून जाण्याचे संकट निर्माण झाले आहे. सदर खरीप पीकास वेळेत पाणी न मिळाल्यास शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागणार आहे. कुकडी प्रकल्पांतर्गत येडगाव व डिंभे धरणात सध्या पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच वरील धरणातून ओव्हर फ्लोचे पाणी सोडण्याच्या विचाराधीन आहे. त्यामुळे ओव्हर फ्लोचे पाणी टेल टू हेड कॅनॉलद्वारे सोडल्यास शेतकऱ्यांच्या खरीप पिकांना जीवदान मिळणार आहे.
तसेच करमाळा तालुक्यातील मांगी तलावामध्ये सध्या पाणीसाठा कमी प्रमाणात आहे. त्यामुळे मांगी तलावाच्या परिसरातील गावांना भविष्यात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार आहे. कुकडी प्रकल्पांतर्गत मांगी तलावात पाणी सोडल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
या आशयाचे पत्र ना.जयंतराव पाटील यांना दिलेले आहे. त्यामुळे कुकडी लाभक्षेत्रातील गावांना लवकरच ओव्हरफ्लो चे पाणी मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे.