प्रतिनिधी / करमाळा
राज्यमार्गावरील करमाळा जेऊर रस्त्यावर झरे फाट्याजवळ लुना गाडीला पाठीमागून आलेल्या कारने धडक देऊन झालेल्या अपघातात दोघेजण ठार झाले आहेत. हा अपघात झरे फाट्याच्या जवळ आज (ता.१०) दुपारी चारच्या सुमारास घडला आहे. या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
यात हकीकत अशी, की झरे येथील प्रवचनकार, किर्तनकार ह.भ.प.हरिश्चंद्र सोपान गायकवाड (वय-६३) हे स्वत:च्या लुनावरून नात संजीवनी शंकर मिटे (वय-१२) हिला घेऊन जावयाच्या हॉटेलचे बांधकाम पाहण्यासाठी झरेहून जात होते. झरे फाट्यापासून पुढे गेल्यानंतर शंकर मिटे यांच्या हॉटेलकडे वळत असताना पाठीमागून आलेल्या इको कार नं.एमएच ४५ एएल ४१४० हिने जोराची धडक दिली. त्यावेळी हे दोघेही लुनावरून रस्त्यावर पडले.
त्यावेळी संजीवनी मिटे ही जागीच ठार झाली तर हरिश्चंद्र गायकवाड यांना करमाळा येथे दवाखान्यात आणत असताना वाटेतच निधन झाले आहे. या प्रकरणी पोलीसात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सदरची इको गाडी ही करमाळा शहरातील असून पोलीसांनी ती जप्त केली आहे.









