करमाळा : प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील खंडीत केलेला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी केलेल्या आंदोलनामुळे तोडगा निघाला. आंदोलनातील शेतकऱ्यांचे नेते दिग्विजय बागल यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन आज रास्तारोको आंदोलन केले होते. यामध्ये तालुक्यातील पूर्व भागासाठी प्रती कनेक्शन अडीच रुपये, तर पश्चिम भागासाठी प्रती डीपी चाळीस हजार रुपये भरण्याचा तोडगा निघाल्यानंतरच आजपासून वीज पुरवठा चालू करण्यात येणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तालुक्यातील पहिले वीज पुरवठा आंदोलन यशस्वी झाल्याचे आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी सांगितले.
आंदोलनास सुरुवात करण्यापूर्वी २६/११ या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. करमाळा येथील मुख्य चौक झालेल्या नगर-सोलापूर हायवेवरील मौलाली चौक येथे हे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनास शेतकऱ्यांचा उस्फुर्त सहभाग होता. आंदोलनाच्या मुख्य मागण्या मंजूर झालेल्या नंतरच आंदोलन थांबवण्यात आले. या आंदोलनाला पोलिस प्रशासन, महावितरणचे अधिकारी यांनी सहकार्य केले. दिग्विजय बागल यांनी तालुक्यातील वीज पुरवठा काढलेल्या या तोडग्यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या आंदोलनासाठी सीना-कोळगाव धरणग्रस्त संघटना, शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, बळीराजा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, बागल गटाचे आजी-माजी पदाधिकारी, कारखान्याचे संचालक, बाजार समितीचे संचालक, विविध गावचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.









