मडगाव पालिका मुख्याधिकाऱयांकडून पाहणी
प्रतिनिधी/ मडगाव
सोनसडा कचरा प्रकल्प शेडमध्ये गोळा होणाऱया रोजच्या कचऱयावर प्रक्रिया करण्यासाठी प्रभावी यंत्रणेची गरज आहे. त्यातच नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यास विलंब होत असल्याने सोनसडय़ावरील कचरा समस्या उग्र बनत चालली आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेचे मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांनी नुकतीच सोनसडय़ाला भेट दिली व परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी काही उपाययोजना राबविण्यासाठी त्यांनी संबंधित अभियंते व अधिकाऱयांना सूचना तसेच निर्देशही दिल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.
मंगळवारी प्रकल्पाच्या आंत टाकलेल्या ओल्या कचऱयातून धूर निघत असल्याचे दिसून आले होते. नंतर पालिकेच्या कामगारांकडून त्यावर उपाय करण्यात आला होता. मुख्याधिकाऱयांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लगेच दुसऱया दिवशी सोनसडय़ाला भेट देऊन पाहणी केली. कचरा प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी पालिकेने फिरत्या पद्धतीने अभियंते नियुक्त केले आहेत. त्यामुळे कचरा प्रक्रियेवर योग्यरीत्या देखरेख ठेवली जात नसल्याचे आढळून आल्याने एकंदर प्रक्रियेबाबत पालिका अभियंत्यांचे लक्ष वेधून मुख्याधिकाऱयांनी त्यांना विशेष लक्ष घालण्याचे निर्देश दिले.
उपाययोजना राबविण्यासंदर्भात मुख्याधिकारी फर्नांडिस यांनी काही निर्देश दिले असून तांत्रिक विभागाला प्रकल्पात स्थापित यंत्रसामग्रीवर देखरेख ठेवताना कचरा मुदतीहून जास्त काळ प्रकल्प शेडच्या आंत जमा होऊन राहणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले आहे. मुख्याधिकाऱयांनी पालिकेच्या तांत्रिक विभागाला सोनसडो यार्डचा रस्ता दुरुस्त करण्याचा निर्देश दिला आहे. वाहनांना व खास करून कचरावाहू ट्रकांना रस्ता धोकादायक ठरणार नाही याची काळजी घेण्यास त्यांनी सांगितले आहे. सोनसडा येथील शेड तसेच आसपासच्या नाल्यांची दुरुस्ती प्राधान्यक्रमाने करण्याचे निर्देश फर्नांडिस यांनी यावेळी दिले.
कंत्राटी कामगारांचे वेतन त्वरित फेडण्याचे निर्देश
या भेटीदरम्यान मुख्याधिकाऱयांना पालिकेकडून मागील दोन महिने कंत्राटी कामगारांचे वेतन फेडले गेले नसल्याचे नजरेस आणून देण्यात आले. तांत्रिक विभागाने आवश्यक प्रक्रिया करण्यास उशीर केल्याने हे वेतन थकले असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर मुख्याधिकाऱयांनी पालिका अभियंत्यांना आवश्यक प्रक्रिया त्वरित करून सदर वेतन फेडण्यास सांगितले. या भेटीनंतर स्वच्छता निरीक्षकांना मुख्याधिकाऱयांनी बोलावून घेतले व एसजीपीडीए पार्किंग लॉट तसेच जुने मासळी मार्केट येथील बेलिंग यंत्रे कार्यान्वित करून सुक्या कचऱयाची विल्हेवाट तत्परतेने लावण्याचे निर्देश दिले. सध्या जुने तंत्रज्ञान घेऊन पालिका प्रशासन सोनसडय़ाचा गाडा हाकत असले, तरी बायोमिथेनेशनसारखे नवीन तंत्रज्ञान उपयोगात आणण्यासाठी पालिका मंडळाने घेतलेल्या निर्णयावर प्रशासन आणि सरकार कधी निर्णय घेते याकडे मडगाववासियांचे लक्ष लागून राहिले आहे.









