सैनिकांना कोणत्याही कठीण परिस्थितीत देशाचे संरक्षण करावे लागते, ही बाब प्रत्येकाच्या परिचयाची आहे. देशाच्या संरक्षणाचे कर्तव्य करीत असताना सतत त्यांचा जीव धोक्यात असतो. तथापि, आता या सैनिकांना सुरक्षित ठेवणारे आणि ते कोठे आहेत, याचा शत्रूला थांगपत्ता लागू न देणारे ‘घर’ निर्माण करण्यात कानपूर येथील संरक्षण उत्पादन केंद्राला यश आले आहे. हे ‘घर’ सेंथेटिक नेट केमोफ्लॅज या तांत्रिक नावाने ओळखले जात असून ते घनदाट वन, वाळवंट, हिमाच्छादित प्रदेश, भूमी किंवा कोणत्याही स्थानी उपयुक्त ठरु शकते.
वास्तविक हे नेहमीच्या घरासारखे घर नाही. तर ते एक अत्याधुनिक पद्धतीचे जाळे आहे. सैनिकांचे वास्तव्य असणाऱया तंबूवर ते टाकले जाते. त्यामुळे तंबू कोठे आहे, याचा पत्ता शत्रूच्या अत्याधुनिक रडार्सना देखील लागत नाही. त्यामुळे सैनिक सुरक्षित राहतात आणि अचानकपणे शत्रूच्या ध्यानी मनी नसताना त्याच्यावर हल्ला चढवू शकतात. भारतीय सेनेला हे ‘जाळे’ आवडले असून त्याची मागणी या केंद्राकडे मोठय़ा प्रमाणात करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
या जाळय़ाचे वैशिष्टय़ असे की, शत्रूच्या रडारपासून किंवा टेहळणी उपकरणांपासून जे इन्फ्रारेड किरण बाहेर पडतात, त्या किरणांना हे जाळे परावर्तित होऊ देत नाही. ते किरण या जाळय़ात शोषले जातात. परिणामी, रडारवर आपल्या सैनिकांचा तंबू कोठे आहे याचा कोणताही सिग्नल येत नाही. परिणामी सैनिक सुरक्षित राहतात. या जाळे शत्रूच्या छातीत धडकी भरविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास भारतीय सेनेला वाटू लागला आहे. कानपूरचे हे केंद्र इतरही अनेक अभिनव आणि कल्पक युद्ध उपकरणांवर संशोधन करीत असून भारतीय सेनेला आधुनिक साधनांच्या दृष्टीने ‘आत्मनिर्भर’ बनविणे हे या संस्थेचे ध्येय आहे.









