मुंबई / वृत्तसंस्था :
पाण्यातून बाहेर असलेला मासा म्हणजे मेलेला मासा, असे चपखल, समर्पक वर्णन करत माजी स्फोटक सलामीवीर विरेंदर सेहवागने कसोटी क्रिकेट पाच दिवसांऐवजी चार दिवस खेळवण्याच्या आयसीसीच्या प्रस्तावावर जोरदार टीका केली. ‘चार दिन की चाँदनी होती है, टेस्ट मॅच नही…..जल की मछली जल में ही अच्छी है, बाहर निकालोगे तो मर जाएगी’, अशा शब्दात, आपल्या खुमासदार शैलीत त्याने आयसीसीच्या प्रस्तावाचा येथे यथेच्छ समाचार घेतला.
‘टेस्ट क्रिकेट को चंदामामा के पास ले जा सकते है….आम्ही दिवस-रात्र क्रिकेट खेळवू शकतो. दिवस-रात्र कसोटी असेल तर कदाचित चाहते आपले ऑफिस संपल्यानंतर स्टेडियमकडे येऊ शकतात. नवे प्रयोग व्हायला हवेत. पण, ते पाच दिवसांच्या क्रिकेटमध्येच. त्याच्यामध्ये अजिबात काटछाट केली जाऊ नये’, असे सेहवाग म्हणतो. रविवारी रात्री बीसीसीआय वार्षिक वितरण सोहळय़ात त्याने पतौडी स्मृती व्याख्यान देत असताना या मुद्याला हात घातला.
मार्च महिन्यात आयसीसी क्रिकेट समिती कसोटी क्रिकेट चार दिवसांचे खेळवले जावे का, या प्रस्तावावर चर्चा करणार आहे. पण, त्यापूर्वीच, या नव्या संकल्पनेला विविध स्तरावरुन कडाडून विरोध होत चालला आहे. विराट कोहली, सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री व इयान बोथम यांच्यासारख्या दिग्गजांनी यापूर्वीच या संकल्पनेवर जोरदार टीका केली आहे.
कसोटी क्रिकेट हा एक प्रकारचा रोमान्स आहे आणि पाच दिवसांचे क्रिकेट चार दिवसांचे करत तो संपवू नये, असे आवाहन सेहवागने येथे केले. तो म्हणाला, ‘मी स्वतः नेहमीच बदलाचे, नव्या प्रयोगांचे स्वागत केले आहे. पण, पाच दिवसांचे कसोटी क्रिकेट हे माझ्या दृष्टीने रोमान्स आहे. गोलंदाज प्रतिस्पर्धी फलंदाजाला बाद करण्यासाठी क्षेत्ररक्षण तैनात करतो आणि त्याचप्रमाणे फलंदाज आपली खेळी समृद्ध करण्यासाठी सारे तंत्र पणाला लावत असतो…स्लीपमधील क्षेत्ररक्षक तर डोळय़ात तेल घालून तैनात असतो. आपल्या प्रेमीने होकार द्यावा, इतकी तळमळ त्याच्या या प्रतिक्षेत असते. हे सारे चित्र पूर्ण दिवसभर असते. त्यामुळे, खेळातील ही नजाकत कायम ठेवण्यासाठी मूळ ढाच्याला अजिबात धक्का लावू नये’.
‘जर्सीवर नंबर घालणे वगैरे मी समजू शकतो. पण, डायपर व पाच दिवसांचे क्रिकेट हे कारण नसताना बदलू नयेत. माझ्या मते कसोटी क्रिकेटमध्ये काहीच समस्या नाही. सध्याच्या भारतीय संघाप्रमाणेच 142 वर्षांचे क्रिकेट तरुण आहे. कसोटी हा खेळाचा आत्मा आहे आणि तो हिरावून घेऊ नये. मागील 5 वर्षात झालेल्या 223 कसोटी सामन्यात 31 सामने अनिर्णीत राहिले, ही टक्केवारी 13 इतकी आहे तर मागील 10 वर्षात 533 कसोटी सामने झाले, त्यात फक्त 83 सामने अनिर्णीत राहिले. 19 टक्के. त्यामुळे, हे चिंतेचे कारण असू शकत नाही’.









