रेल्वे दुपदरीकरणासह विरोध : तिन्ही प्रकल्प वन्यसंपदेच्या मुळावर
प्रतिनिधी / धारबांदोडा
केंद्र सरकारतर्फे मोले येथील भगवान महावीर अभयारण्य व मोले राष्ट्रीय उद्यानात होऊ घातलेल्या तीन प्रकल्पांना विरोध करण्यासाठी उभारण्यात आलेल्या ‘सेव मोलेम’ या संघटनेतर्फे कुळे येथे निदर्शने करण्यात आली. या प्रकल्पांना सध्या सर्व स्थरातून विरोध होत आहे.
यड निदर्शनादरम्यान कामगार नेते तथा कुळे पंचायतीचे माजी सरपंच नरेश शिगांवकर यांनी या प्रकल्पांना कडाडून विरोध केला. भगवान महावीर अभयारण्य व मोले राष्ट्रीय उद्यान हा कुळे गावचा अविभाज्य भाग आहे. येथील दूधसागर धबधबा हे जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. या नवीन प्रकल्पांमुळे वास्को ते कॅसरलॉक रेल्वे दुपदरीकरणाच्या विस्तारासाठी 30 मिटर ज्यादा जागा ताब्यात घेण्यात येणार आहे. त्यामुळे वन्यजीव संपदेबरोबरच, प्राण्यांच्या दुर्मिळ प्रजाती, रॉक गार्डन तसेच जगातील 25 वे आश्चर्य ठरलेल्या पश्चिम घाटीचा विध्वंस होणार आहे. शिवाय दूधसागर धबधब्याचे अस्तित्व धोक्यात येणार असल्याची शक्यता नरेश शिगांवकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
दूधसागर धबधब्याचे अस्थित्त्व धोक्यात येणार
रेल्वे दुपदरी करणामुळे येथील जनतेला कोणताच लाभ होणार नाही. शिवाय रोजगारही मिळणार नाही. येथील असंख्य लोकांची उपजिविका दूधसागर धबधबा पर्यटनावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या अवलंबून आहे. त्यावर संकट येणार आहे. प्रस्तावित तिन्ही प्रकल्पांसाठी हजारो झाडांची कत्तल होणार आहे. यामुळे रानटी जनावरांचे अदिवास धोक्यात येऊन त्यांचा लोकवस्तीकडे मोठय़ाप्रमाणात वावर वाढणार आहे. सध्या रानटी जनावरे लोक वस्तीत घुसून उपद्रव मांडित आहेतच, रेल्वे दुपदरीकरणासाठी झाडांची कत्तल हे प्रमाण वाढणार आहे. त्यासाठी लोकांनी एकसंघपणे या प्रकल्पांना विरोध केला करण्याचे आवाहन शिगांवकर यांनी केले.
आज या तिन्ही प्रस्तावित प्रकल्पांना केवळ स्थानिकच नव्हे तर गोव्यातील टूर ऍण्ड ट्रेव्हल्स टय़ुरिझम असोसिएशन, डॉक्टर्स, विद्यार्थी, महिलावर्ग, संशोधक विरोध करीत आहेत. शिवाय कस्तुरीरंजन अहवालही या प्रकल्पांच्या विरोधात आहे, असेही ते म्हणाले.
मोलेचे नागरिक व दूधसागर टूर ऑपरेटर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य ट्रिपोलो सौझा यांनी मोले येथील रहिवाशांचा राष्ट्रीय हमरस्त्याचे चौपदरीकरण, ट्रान्समिशन लाईन व रेल्वे दुपदरीकरणाला विरोध असल्याचे सांगितले. या तिन्ही प्रस्तावित प्रकल्पांमुळे सर्वसामान्य जनतेला काहीच फायदा नसून कॉर्पोरेट घराण्यासाठी लाभ मिळवून देण्यासाठी पर्यावरणावर घाला घातला जाणार आहे. कुठल्याही परिस्थितीत कुळे शिगांव पंचायतमधील नागरिकांनी रेल्वे दुपदरीकरणाला विरोध केला पाहिजे. जेणे करून दूधसागर धबधब्याच्या सौंदर्याला बाधा येणार नाही, असे त्यांनी सांगितले.
सेव मोलम् तसेच सेव गोवा असोसिएशनचे उपाध्यक्ष ज्युलियो आगियार यांनी प्रस्तावित रेल्वे दुपदरीकरण हा फक्त कोळसा वाहतुकीसाठी बांधला जात असून त्यात मोजक्याच भांडवलदारांचे हित सरकार पाहत असल्याचा आरोप केला. यावेळी कुळेतील नागरिक उपस्थित होते.









