प्रतिनिधी/ सातारा
शहरातील सर्वात जास्त गजबजलेला परिसर म्हणजे एसटी स्टॅड आहे. एसटी स्टॅडलगतच सेवन स्टॉर मॉल असून या ठिकाणी पिचर बघण्यासाठी, खाद्य पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी महिला, युवती, तरूण मोठय़ा संख्येने येतात. यावेळी परिसरात टवाळखोरांचा वावर सातत्याने होत असतो. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी मारामारी, शब्दीक वादाच्या घटना घडत आहेत. यामुळे परिसरातील वातावरण असुरक्षित झाले आहे. मात्र पोलीस प्रशासनाकडून बघ्याची भूमिका घेतली जात आहे.
शहरातील शाळा व महाविद्यालयीन परिसरात छेडछाडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी निर्भया पथकांची स्थापना करण्यात आली. पोलिसांचा वॉच रहावा म्हणून वायसी कॉलेजच्या परिसरात महाराष्ट्रातील पहिली निर्भया पोलीस चौकी उभारण्यात आली. यामुळे महाविद्यालयीन परिसरात पोलिसांचा दबदबा चांगलाच वाढला आहे. परंतु पोलिसांची ही धास्ती शहरातील इतर परिसरात दिसत नसून एसटी स्टॅड लगतचा सेवन स्टॉर मॉल हा टवाळखोरांचा अड्डा बनला आहे. एसटी महामंडळ सातारा आगारात ग्रामीण भागातून प्रवासी, विद्यार्थी, महिला, युवती दररोज शहरात येतात. यामुळे एसटी स्टॅडवर गर्दीचे प्रमाण वाढलेले असते.
पोलिसांची बघ्यांची भूमीका
प्रवासादरम्यान महिला, युवतींना धक्काबुक्की करणे, टिंगल करणे, पाठलाग करणे असे प्रकार घडत असतात. यामुळे प्रवासदरम्यान असुरक्षितेचे वातावरण निर्माण झालेले असते. अशा घटना रोजच घडत असल्याने यांची तक्रार कुणाकडे, कशाला करायची म्हणून महिला, युवती याला वाचा फोडत नाहीत. याचा टवाळखोरांनी चांगला फायदा घेतला आहे. एसटी स्टॅडनंतर सेवन स्टॉर मॉलच्या पे ऍन्ड पार्कमध्ये टवाळखोर फिरत असतात. या ठिकाणी कपडे, सौदर्य प्रसाधने यांच्या खरेदीसाठी, पिचर बघण्यासाठी, खाद्य पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी नेहमी महिला, युवती गर्दी करतात. या गर्दीचा फायदा घेत नाहक त्रास देण्याचे प्रकार घडत आहेत. दोन गटात वाद झाल्यास या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण निर्माण होते. वारंवार असे प्रकार घडत असताना पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत. यामुळे महिला सुरक्षितेचा पुन्हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.









