वृत्तसंस्था/ मुंबई
सॅमसंग कंपनी आपल्या उत्पादनांना वाढती मागणी लक्षात घेऊन येणाऱया काळात विक्रीत वाढ करण्यासाठी जोमाने प्रयत्न करणार असल्याचे समजते. येणाऱया काळात विविध सणउत्सव साजरे होणार असून त्यावेळी होणारी मागणी लक्षात घेऊन नवनवे फोन्सही लाँच केले जाण्याची शक्यता सांगितली जात आहे.
अलीकडच्या लॉकडाऊन-अनलॉकच्या काळात भारतात मोबाईलच्या मागणीत चांगलीच वाढ झालेली आहे. सध्याच्या काळात मोबाईलचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढला असून युवकांची संख्या यात जास्त दिसून आली आहे. अधिकतर लोक दिवसाचा जास्तीचा वेळ मोबाईल वापरण्यात घालवत असल्याचेही सॅमसंगला पाहणीत दिसून आले आहे. म्हणूनच हे सारे वातावरण पाहता यंदा वर्षाच्या शेवटच्या सहा महिन्यात ऑनलाइन मोबाईलच्या विक्रीत दुप्पट वाढ होण्याची आशा कंपनीने व्यक्त केली आहे.
काही नव्या मोबाईल फोनच्या सादरीकरणामुळे ग्राहकांचे लक्ष वेधले जात असून त्याचे मागणीत रूपांतर होताना दिसते आहे. यावरूनच सॅमसंगच्या मोबाईल्स विक्रीत वाढीचे संकेत दिसत आहेत. कंपनीचा ऑनलाईन व्यवसाय मागच्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट होईल, असाही अंदाज कंपनीने वर्तवला आहे. ‘नोट’ आणि ‘एस’ सीरीज यासह ‘एम’ सिरीजच्या स्मार्टफोन्सना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. यातील काही उत्पादने भारतातच तयार केली जात आहेत. एकंदर मोबाईल विक्रीच्या बाजारपेठेत सॅमसंगचा वाटा 24 टक्के आहे.
स्मार्टफोन्सच्या शर्यतीत कंपनीला ऍपल, वन प्लस, शाओमी, विवो, रियलमी तसेच ओप्पो यांच्याशी स्पर्धा करावी लागते आहे. मध्यंतरी लॉकडाऊन आणि अनलॉकच्या काळामध्ये मोबाईलच्या मागणीत आणि वापरात वाढ झाल्याचे दिसून आले. 2019 मध्ये प्रत्येक भारतीय आपला सरासरी 3.5 तासाचा वेळ फोनवर घालवत होता तर याच तुलनेमध्ये यंदाच्या मार्चमध्ये हे प्रमाण चार तासांवर आले आहे. याचा अर्थ मोबाईलच्या तासाच्या वापरात वाढ झाली आहे. तेव्हा सध्या ग्राहक उत्तम बॅटरी क्षमता असलेले स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी उत्सुक दिसत असून असे स्मार्टफोन्स जास्त विक्री होतील, असेही कंपनीला वाटते आहे.









