कोविड मार्गसूचीनुसार शासकीय इतमामात नवी दिल्ली येथे अंत्यसंस्कार
प्रतिनिधी/ बेंगळूर
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे सर्वांना धक्काच बसला आहे. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सायंकाळी नवी दिल्लीच्या द्वारका सेक्टर 24 येथील स्मशानभूमीत कोरोना मार्गसूचीनुसार शासकीय इतमामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रसंगी त्यांच्या पत्नी मंगला, मुली, जावई, नातेवाईक, मंत्री जगदीश शेट्टर, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, मंत्री रमेश जारकीहोळी, मंत्री व्ही. सोमण्णा तसेच खासदार इरण्णा कडाडी, आण्णासाहेब जोल्ले उपस्थित होते.
संसदेच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी नवी दिल्लीला गेल्यानंतर सुरेश अंगडी यांनी कोरोना चाचणी केली होती. याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ते दिल्लीतील एम्स इस्पितळात उपचारासाठी दाखल झाले. मात्र, उपचाराचा उपयोग न झाल्याने बुधवार दि. 23 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. कोरोना मार्गसूचीनुसार त्यांचे पार्थिव बेळगावला आणणे शक्य नसल्याने दिल्लीतच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याकरिता त्यांचे कुटुंबीय गुरुवारी सकाळी नवी दिल्लीला गेले होते. शासकीय इतमामात अंगडी यांच्यावर लिंगायत विधींनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी रेल्वे खात्याच्या पोलिसांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून सुरेश अंगडी यांना मानवंदना दिली.
कोरोनामुळे सुरेश अंगडी यांचे निधन झाल्यामुळे कोविड-19 नियमांनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिल्लीतील स्मशानभूमीत निवडक जणांनाच प्रवेश देण्यात आला होता. पीपीई किट परिधान करून त्यांचे कुटुंबीय सुरेश अंगडी यांच्या अंत्यविधीमध्ये सहभागी झाले होते.
मातोश्रींना ऑनलाईनद्वारे अंत्यविधी पाहण्याची व्यवस्था
मंत्री सुरेश अंगडी यांच्या मातोश्री सोमव्वा अंगडी यांना मुलाच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेणे शक्य झाले नाही. सुरेश अंगडी यांच्या निधनाचे वृत्त त्यांना गुरुवारी के. के. कोप्प येथील निवासस्थानी सांगण्यात आले. मुलाच्या जाण्याने सोमव्वा अंगडी यांच्यावर दुःखाचा डेंगर कोसळला. सकाळीच त्यांना बेळगावमधील निवासस्थानी आणण्यात आले. मात्र, वयोवृद्ध असल्याने त्यांना दिल्लीला नेणे कुटुंबीयांना शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांच्या मातोश्रींना ऑनलाईनद्वारे अंत्यविधी पाहण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
बेळगाव तालुक्यातील के. के. कोप्प येथे 1 जून 1955 रोजी सुरेश अंगडी यांचा जन्म झाला होता. बी. कॉम, एलएलबी पदवीधर असणाऱया सुरेश अंगडी यांनी 1996 मध्ये आपल्या राजकीय प्रवासाला प्रारंभ केला होता. 2004, 2008, 2014 आणि 2019 अशा सलग चार लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी विजय मिळविला होता. 30 मे 2019 रोजी त्यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.
कर्नाटक विधानसभेत श्रद्धांजली
कोरोनामुळे निधन झालेल्या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांना गुरुवारी सकाळी विधानसभेमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या सन्मानार्थ सभागृहाचे कामकाज अर्धा तास पुढे ढकलण्यात आले. सकाळी पुन्हा सभागृहाच्या कामकाजाला प्रारंभ होताच विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी शोकप्रस्ताव मांडला. रेल्वे राज्यमंत्रिपदाची धुरा हाती घेतल्यानंतर सुरेश अंगडी यांनी उत्तर कर्नाटकातील धूळ खात पडलेल्या अनेक रेल्वे योजनांना मंजुरी मिळवून दिली, असे सांगितले. त्याचप्रमाणे कायदा मंत्री जे. सी. माधुस्वामी, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, महांतेश कौजलगी, आर. व्ही. देशपांडे, एच. के. पाटील यांच्यासह इतरांनी देखील अंगडी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.