मूळ नाटळ येथील नीलेश सावंत सांगताहेत सिंगापूरमधील लॉकडाऊनचे अनुभव
कोरोना बाधित देशांतून येणाऱया प्रवाशांवर निर्बंध
सरकारकडून नागरिकांना मेसेजद्वारे दिली जाते माहिती
विनय सावंत / कनेडी:
आशिया खंडातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला व बँका, आयटी कंपन्या, जहाज बांधणी कंपनी तसेच इतर कॉर्पोरेट कंपन्यांची मुख्य ऑफिसेस असलेल्या सिंगापूरला कोरोनाची लागण जानेवारी महिन्यातच सुरू झाली. मात्र, कोरोनाचा प्रसार ओळखून चीन आणि इतर देशातून येणाऱया प्रवाशांवर निर्बंध घातले म्हणूनच कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण येथे कमी आहे. सिंगापूरला 3 जूनपर्यंत हे लॉकडाऊन आधीच जाहीर करण्यात आला आहे, असे मूळ नाटळ राजवाडी (ता. कणकवली) येथील नीलेश सदानंद सावंत यांनी ‘तरुण भारत’शी व्हॉटस ऍप कॉलिंगद्वारे बोलताना सांगितले.
नीलेश सावंत यांनी मुंबई येथे शालेय व महाविद्यालय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये एमबीए करण्यासाठी सिंगापूरला गेले व 12 वर्षे तेथेच मरिना बाय सॅण्डस् या कंपनीत इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी डायरेक्टर या पदावर काम करत आहेत. त्यांच्या पत्नी पूजा या शिपिंग कंपनीत जॉब करत असून त्यांना दोन वर्षांची मुलगी सनाह आहे.
सिंगापूरवर कॅमेऱयांद्वारे मदत
नीलेश सावंत सांगतात, सिंगापूरमध्ये स्थानिक लोक घरी जेवण बनविण्याचे प्रमाण कमी आहे. रेस्टॉरंटमधूनच अधिकतर ऑर्डर करतात. फक्त बाहेरील देशातून आलेले कामगारच आपल्या पद्धतीचे घरगुती जेवण बनवतात. बाहेरच्या देशातून आलेल्या कामगारांची इथे मोठी कामगार वसाहत येथे आहे. सिंगापूरवर पूर्ण नजर कॅमेऱयांद्वारे ठेवली जाते. इथे पोलीस रस्त्यावर फिरताना दिसणार नाहीत. कोरोना संशयितांना स्थानिक क्लिनिकमध्ये तपासणी करून आयसोलेशन करून ठेवतात नंतर रुग्णवाहिका येते व संशयिताला कोरोना हॉस्पिटलला घेऊन जाते. तो पूर्ण भाग ब्लॉक करून दोन दिवसांनी मोकळा करतात. सिंगापूर सरकारकडून नवीन रुग्ण किती, मृत किती, एकूण रुग्ण किती आदी रोजची माहिती नागरिकांना मेसेज करून दिली जाते.
कोविड-19 आणि सिंगापूर
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही भाषणात, सिंगापूरने कोरोनावर चांगले नियंत्रण ठेवले आहे, असा उल्लेख केला होता. सिंगापूरमध्ये डॉरस्कोन (DORSCON) नावाची प्रणाली रोगाचा प्रादुर्भाव वेगवेगळय़ा रंगात दर्शविते. आज महाराष्ट्रात वापरण्यात येणाऱया कलर कोडिंगला सिंगापूरच्या डॉरस्कोनची पार्श्वभूमी आहे. सिंगापूर हे आशियातील महत्वाचे पर्यटन व व्यावसायिक ठिकाण असल्याने येथे रोज हजारो पर्यटक येतात. असे असूनही सिंगापूरने कोरोनाच्या प्रादुर्भावावर चांगले नियंत्रण ठेवले आहे.
कोरोना प्रभावित देशांमध्ये प्रवासी निर्बंध
सिंगापूर सरकारने सुरुवातीलाच कोरोनाचा प्रसार ओळखला आणि त्यांनी चीन आणि इतर प्रभावित देशांमध्ये प्रवासी निर्बंध घातले. वर्षाच्या सुरुवातीलाच, सिंगापूरमध्ये कॉन्टॅक्ट टेसिंग सिस्टिम लागू करून मोठय़ा प्रमाणात व्हायरसचा प्रभाव रोखला. सिंगापूरने जानेवारीच्या सुरुवातीस डोरस्कोनची लेव्हल पिवळय़ा रंगात बदलली. फेब्रुवारीत भगव्यामध्ये बदलली गेली. मार्चमध्ये सरकारने सर्किट ब्रेकरची घोषणा करून अधिक निर्बंध लादले. सर्किट ब्रेकर म्हणजे केवळ अत्यावश्यक सेवा खुल्या असतात. फक्त घरपोच सेवेसाठी रेस्टॉरंट्स खुली असतात. ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे शाळांनी ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे. सरकारने केलेल्या सर्किट ब्रेकरच्या घोषणेअगोदरच अनेक कंपन्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू केले होते.
नियमांचे काटेकोर पालन करावे लागते
सिंगापूरमध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क घालण्याचे काटेकोरपणे पालन करावे लागते. सरकारी अधिकारी अचानक तपासणी करतात. नियम उल्लंघन करणारे कोणी आढळल्यास त्याला भारी दंड आकारला जातो. (पहिला अपराध 300 सिंगापूर डॉलर, दुसरा अपराध 10,000 आणि तिसरा अपराध 6 महिने जेल.) सरकारी अधिकाऱयांनी दिलेल्या स्टे होम नोटिसीचे उल्लंघन करणाऱयांचा व्हिसा, वर्क परमिट आणि रहिवासाचा दर्जा सिंगापूर सरकारने रद्द केला आहे. हे सिंगापूरच्या नेहमीच्या शिस्तबद्ध प्रतिमेस शोभते. ही कठोर कारवाई करताना, लोकांना ताज्या हवेसाठी बाहेर जाण्यास आणि व्यायाम करण्यास सरकार अनुमती देते. मात्र, सुरक्षित अंतर राखून आणि मास्क घालूनच. सरकारने सर्व रहिवाशांना विनामूल्य मास्क व सॅनिटायझर्सचे वाटप केले.
प्रगत आरोग्य यंत्रणेचा फायदा
कोरोनाचा जसजसा प्रसार जगात होऊ लागला, तसे सिंगापूरवासियांनी लॉकडाऊन घोषणेनंतर सुपर मार्केटमधून आवश्यक वस्तू खरेदी केल्या. सरकारनेही सिंगापूरवासियांना पुरेसे स्टॉक उपलब्धतेचे आश्वासन दिले. खरेदीवर निर्बंध घातले. खरेदीसाठी एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त सदस्य घराबाहेर जाऊ शकत नाहीत. सिंगापूरच्या प्रगत आरोग्य यंत्रणेमुळेच 28 एप्रिलपर्यंत जवळपास 15 हजार पॉझिटिव्ह केसेस आढळल्या, त्यातील 12 हजार परदेशी कामगार वसतिगृहातील होते. यातील केवळ 15 नागरिकांचा मृत्यू झाला. सिंगापूरचे पंतप्रधान ली रहिवाशांशी संवाद साधतात. सरकारकडून नियमितपणे अद्ययावत उपाययोजना करत आहेत. 80 टक्के पॉझिटिव्ह केसेस या विदेशी कामगार वसतिगृहातील आहेत. परदेशी कामगारांच्या हिताकडे सरकार कटाक्षाने लक्ष देत आहे. आजच्या सिंगापूरचे वैभव उभारण्यात परदेशी कामगारांच्या योगदानाचे त्यांनी कौतूक केले.
एकता अन् शिस्तीने लढा
जगाच्या इतर देशांप्रमाणेच सिंगापूरही कोविड-19 विरुद्ध एकता आणि शिस्तीने लढा देण्यास कटिबद्ध आहे. आमच्याकडे ‘एसजी यूनायटेड’ असा मोटो आहे. कोविड-19 चे लवकरच इतिहासात रुपांतर होऊ दे. जेणेकरून आमच्या सुंदर शहरात सुरळीत दैनंदिन जीवन पुन्हा सुरू करू शकू, हीच रामेश्वर चरणी प्रार्थना करावीशी वाटतेय, असे नीलेश सावंत यांनी सांगितले.









