ऑनलाईन टीम / पारामारिबो :
सुरीनामचे राष्ट्रपती चंद्रिकाप्रसाद संतोखी यांनी नुकतीच वेदमंत्राचा उच्चार करत पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. चंद्रिकाप्रसाद हे भारतीय वंशाचे असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मन की बात कार्यक्रमात त्यांचा उल्लेख केला.
सुरिनाम हा देश दक्षिण अमेरिकेच्या ईशान्य किनारपट्टीवर वसलेला आहे. चंद्रिकाप्रसाद संतोखी हे प्रोग्रेसिव्ह रिफॉर्म पार्टीचे नेते आहेत. या देशात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत प्रोग्रेसिव्ह रिफॉर्म पक्षाने एकतर्फी विजय मिळवला. बॉऊटर्स यांचा नॅशनल पार्टी ऑफ सुरीनाम मे महिन्यात झालेल्या निवडणुकीमध्ये पराभूत झाला होता. बॉऊटर्स यांनी त्यांच्या कार्यकाळात चीन आणि व्हेनेझुएला यांच्याशी अधिक जवळीक केली. त्यांच्या आर्थिक आणि राजकीय धोरणांचे अनुकरण केले. नेदरलँड्सबरोबर चालणारा व्यापार त्यांनी रसातळाला नेला. बॉऊटर्स यांच्यावर खून आणि अमली पदार्थांच्या तस्करीचे आरोप आहेत.
संतोखी हे या देशाचे पोलिस प्रमुख होते. 2005 पूर्वी त्यांनी कायदामंत्री म्हणूनही काम केले आहे. सुरीनाममध्ये 27 टक्के भारतीय नागरिक राहतात. बॉऊटर्स यांच्या कार्यकाळात वाढलेला भ्रष्टाचार आणि देशाची दिवाळखोरीच्या वाटेवर असलेली अर्थव्यवस्था आणि देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ही संतोखी यांच्यासमोरील आव्हाने असतील.