जिल्हा इस्पितळात झाली होती ताटातूट
प्रतिनिधी /मडगांव
एखाद्या चित्रपटात चिमुकल्या मुलाची ताटातूट झाल्यानंतर आईची काय परिस्थिती होत असते, याचे चित्रण आपण अनेकदा पाहिले आहे. आणि त्याची पुन्हा भेट झाल्यानंतर होणार आनंदही आपण बिघतला आहे. असेच चित्र काल फातोर्डा-मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात पहायला मिळाले. यात महत्वाची भूमिका बजावली ती येथील सुरक्षारक्षकाने…
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात काल सकाळी एका चिमुकल्याची आईपासून ताटातूट झाली. आपल्या आई पासून भरकटलेल्या मुलाची सुरक्षा रक्षकाने सतर्कता दाखविल्याने परत आईशी गाठ पडली. एक महिला आज सकाळी आपल्या मुलाला घेऊन इस्पितळात आली होती. मात्र ती आपले काम करण्यात गर्क असताना तिचे लहान मूल तिथून निसटल्याने दोघांची ताटातूट झाली.
यावेळी डय़ूटीवर असलेल्या पाईक वेळीप या सुरक्षारक्षकाने आपल्या आईला शोधणाऱया या मुलाला आपल्या ताब्यात घेतले. आणि त्याने सहायक सुरक्षा पर्यवेक्षक सगुण सालेलकर यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना झाल्या प्रकाराची कल्पना दिली. त्यानंतर सुरक्षा पर्यवेक्षकांनी त्या मुलाच्या आईचा शोध घेण्यास सुरुवात केली.
मुलाची आईही आपल्या हरवलेल्या मुलाचा शोध घेत होती. तिच्याशी गाठभेट झाल्यावर मुलाला तिच्या स्वाधीन करण्यात आलं. आपली हरवलेली आईं सापडल्यावर ते मुलही आपल्या मातेला बिलगले. आपले मुल सापडल्याने आईला देखील आनंद झाला. काही वेळ का असेना मायलेक एकमेकापासुन तुटले होते व त्याची परिस्थिती अवघड झाली होती. अशा वेळी त्यांच्या मतदीला आले ते हॉस्पिटलातील सुरक्षारक्षक. या सुरक्षारक्षकांना त्या मातेने मनापापसून धन्यवार दिले.









