वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा अव्वल नेमबाज जितू राय याने क्रीडा क्षेत्रात आपल्या देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. लष्कराच्या सेवेमध्ये असणाऱया जितू राय सुभेदार मेजर या पदावर नियुक्ती करण्यात आली असून तो आता मणिपूरमध्ये सेवा बजावत आहे.
नेमबाज जितू रायची सुबेदार मेजरपदी बढती मिळाल्यानंतर इंदूरहून मणिपूरमध्ये आला आहे. भारतीय सेना दलातील 11 गुरखा रायफल्स या रेजिमेंटचा तो सैनिक आहे. या रेजिमेंटची एक तुकडी मणिपूरच्या सरहद्दीवर देशाची सेवा बजावत असून 33 वषीय जितू राय आता क्रीडा क्षेत्राप्रमाणेच लष्कराच्या सेवेतही देशाची सेवा करीत आहे. देशाचे संरक्षण करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची करण्याची संधी काही जणांनाच मिळते आणि याबाबतीत मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, असे जितू रायने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. 2016 साली जितू रायचा खेलरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता. त्याचप्रमाणे त्याला याच वर्षात पद्मश्री किताबही भारतीय शासनाकडून प्रदान करण्यात आला होता. जितू रायची पत्नी आणि 14 महिन्यांचा मुलगा हे सध्या इंदूरमध्ये स्थायिक आहेत.









