कोलकाता नाईट रायडर्सचा विंडीज फिरकीपटू सुनील नरेनच्या गोलंदाजी शैलीवर आक्षेप घेण्यात आला असून यामुळे आयपीएल स्पर्धेत त्याच्या गोलंदाजीवर निर्बंध येऊ शकतात. शनिवारी किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध लढतीत 32 वर्षीय नरेनच्या शैलीवर आक्षेप आले. या लढतीत त्याने 2 बळी घेतले तर केकेआरने 165 धावांचे संरक्षण करताना 2 धावांनी निसटता विजय संपादन केला.
‘’आयपीएल संशयास्पद अवैध गोलंदाजी शैली धोरणानुसार मैदानी पंचांनी नरेनच्या गोलंदाजीवर आक्षेप नोंदवला आहे. यापुढेही नरेनला गोलंदाजी करण्याची परवानगी असेल. पण, त्याच्या गोलंदाजीवर पथकाची विशेष नजर असेल. त्याच्या गोलंदाजी शैलीवर आणखी एक आक्षेप आला तर त्याला उर्वरित आयपीएल हंगामात गोलंदाजी करता येणार नाही’, असे आयपीएल कार्यकारिणीने पत्रकाद्वारे नमूद केले.
यापूर्वी, 2015 मध्ये सुनील नरेनला आक्षेपार्ह गोलंदाजी शैलीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्याची बंदी सोसावी लागली होती. नंतर शैलीत सुधारणा केल्यानंतर 2016 मध्ये त्याला सर्व क्रिकेट प्रकारातून गोलंदाजी करण्याची परवानगी देण्यात आली होती.
‘शैलीत सुधारणा केल्यानंतर नरेनच्या गोलंदाजीचा करिष्मा कमी झाला होता. केकेआरने दोन सामने जिंकले, त्यात नरेनचा वाटा महत्त्वाचा राहिला. पण, आक्षेपार्ह गोलंदाजी शैलीबाबत नियमानुसार कारवाई केली जाईल’, असे आयपीएलमधील एका सूत्राने गोपनियतेच्या अटीवर नमूद केले. 2018 पाकिस्तान सुपर लीगमध्येही त्याच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आले. पण, नंतर त्याची त्यातून मुक्तताही केली गेली. गोलंदाजी शैलीवर सातत्याने आक्षेप घेतले जात असताना सुनील नरेनने आपल्या फलंदाजीवर बरीच मेहनत घेतली आहे.









