आतापर्यंत अडीच हजारहून अधिक जणांची सुटका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सुदानमधील संघर्षातून बाहेर काढण्यात आलेले आणखी 365 भारतीय रविवारी दिल्लीत दाखल झाले. सुदानमधून सुटका करण्यात आलेल्या भारतीयांची ही सहावी तुकडी आहे. यापूर्वी 231 भारतीयांना घेऊन एक विमान शनिवारी सकाळी नवी दिल्लीला पोहोचले होते. तसेच 229 भारतीयांसह एक विमान बेंगळूर येथे पोहोचले आहे. त्याचबरोबर आता ‘आयएनएस तेग’मधून 288 भारतीयांची 14 वी तुकडी जेद्दाहला रवाना झाली आहे.
सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना वाचविण्यासाठी दुतावासाच्या वतीने मिशन कावेरी अभियान राबविण्यात येत आहे. आतापर्यंत अडीच हजारहून अधिक लोकांना मायदेशी आणण्यात आले असून उर्वरित लोकांना आणण्याचे प्रयत्नही युद्धपातळीवर सुरू आहेत. 27-28 एप्रिलच्या रात्री हे धाडसी मोहीम राबवत हवाई दलाने प्रत्यक्ष युद्धभूमीवर उतरून कित्येक भारतीयांना सुरक्षितपणे जेद्दाहपर्यंत आणले आहे. भारतीय वायुसेनेच्या आयएनएस सुमेधा, तेग, तरकश आणि सी-130जे या नौदलाच्या जहाजांद्वारे हे बचाव कार्य केले जात आहे. भारताप्रमाणेच अमेरिकाही सुदानमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांची सुटका करत आहे.









