नीना क्रिकेट अकादमी आयोजित टी-10 क्रिकेट स्पर्धेला शानदार प्रारंभ
बेळगाव
आझमनगर येथील नीना क्रिकेट अकादमीतर्फे युनियन जिमखाना मैदानावर आयोजित टी-10 क्रिकेट स्पर्धेला शुक्रवारी शानदार प्रारंभ झाला. विविध साखळी सामन्यात सीसीआय, ग्लॅडिएटर, बाळू पाटील इलेव्हन संघांनी विजयी सलामी दिली. केतज कोल्हापुरे (सीसीआय), यश कळसण्णावर (ग्लॅडिएटर), अंगदराज हित्तलमनी (बाळू पाटील इलेव्हन) सामनावीराचे मानकरी ठरले.
स्पर्धेचे उद्घाटन एजाझ खान यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नासीर पठाण, हुसेन गोकाक, मेहफूज दफेदार, प्रणय शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनाच्या सामन्यात सीसीआय संघाने इंडियन बॉईज संघाचा 36 धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली. प्रथम फलंदाजी करताना सीसीआय संघाने 10 षटकात 4 गडी गमावून 134 धावा जमविल्या. प्रत्त्युत्तरादाखल इंडियन बॉईज संघाने 10 षटकात 3 बाद 97 धावा जमविल्या. सर्वाधिक 54 धावा फटकाविलेल्या केतज कोल्हापुरे याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
दुसऱया सामन्यात ग्लॅडिएटर संघाने प्रेण्डस् इलेव्हन संघाला 6 गडी राखून पराभूत केले. पेण्डस् इलेव्हन संघाने 10 षटकात 3 बाद 82 धावा जमविल्या. त्यानंतर ग्लॅडिएटर संघाने केवळ 8.4 षटकात 4 बाद 83 धावा जमवित विजय मिळविला. 28 धावा जमविणाऱया यश कळसण्णावरला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
तिसऱया सामन्यात अर्जुन स्पोर्टस् संघाने इलेव्हन स्टार्स संघाचा 7 गडी राखून पराभव केला. इलेव्हन स्टार्स संघाने 10 षटकात 3 बाद 84 धावा जमविल्या तर अर्जुन स्पोर्ट्स संघाने 9.3 षटकात 3 गडी गमावून 85 धावा काढल्या. सर्वाधिक 32 धावा काढलेल्या गणेश जांभळेला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
चौथ्या सामन्यात बाळू पाटील इलेव्हन संघाने सीसीआय संघाचा 6 गडी राखून पराभव केला. सीसीआय संघाने 8.2 ष्टकात 10 गडी गमावून 74 धावा जमविल्या. प्रत्त्युत्तरादाखल बाळू पाटील इलेव्हन संघाने 9.2 षटकात 4 गडी गमावून 76 धावा काढल्या. अष्टपैलू खेळी केलेल्या अंगदराज हित्तलमनीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
आजचे सामने -1) इलेव्हन स्टार्स वि. पेण्डस् इलेव्हन (सकाळी 9.30 वा.), 2) अर्जुन स्पोर्ट्स वि. ग्लॅडिएटर (11.15 वा), 3) इंडियन बॉईज वि. बाळू पाटील इलेव्हन (दु. 1.15 वा.), 4) ग्लॅडिएटर वि. इलेव्हन स्टार्स (दु. 3.15 वा.)









