खासदार अमोल कोल्हे यांची ग्वाही : बेळगावला दिली धावती भेट
प्रतिनिधी /बेळगाव
सीमावासीय 65 वर्षांपासून आपल्या भाषा व संस्कृतीसाठी तळमळीने लढा देत आहेत. सीमाभागातील आंदोलने जवळून पाहिली आहेत, त्यामुळे होणारी गळचेपी, तिरस्काराची भावना याची मला जाणिव आहे. ज्येष्ट नेते शरद पवार यांच्या पाठिशी राहून सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत. सीमावासियांचा हा आवाज संसदेपर्यंत पोहचवू, अशी ग्वाही शिरूर (महाराष्ट्र) येथील खासदार व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी बेळगाववासियांना दिली.
बेंगळूर येथे शिवजयंती साजरी करून मुंबई येथे परतत असताना शनिवारी रात्री बेळगावला त्यांनी धावती भेट दिली. सीमावासियांशी संवाद साधताना ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमचा स्वाभिमान आहे. त्यामुळे ज्याठिकाणी त्यांचा अवमान झाला त्याच ठिकाणी जावून दुग्धाभिषेक केला आणि अपमानाचा बदला घेतला. तेथे दिलेल्या शिवगर्जनेने बेंगळूरमधील छत्रपतींचे अस्तित्व पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचे त्यांनी सांगितले.
बेळगावशी अनामिक नाते
बेळगाव शहराचे व माझे एक अनामिक नाते आहे. बेळगावमध्ये सर्वांत मोठी दुर्गामाता दौड काढण्यात येते. त्या दौडमध्ये सहभागी होण्याची इच्छा होती. अखेर ती इच्छा पूर्ण झाली आणि त्या दिवशी बेळगावकरांची छत्रपतींविषयीची आस्था पहायला मिळाली. त्या दिवसापासून बेळगाव शहरवासियांच्या प्रेमात पडलो. त्यानंतर शंभूराजे नाटक व मराठी टायगर्स या चित्रपटासाठी बेळगावला आल्याची आठवण त्यांनी
सांगितली.