प्रतिनिधी/ सातारा
एकीकडे कोरोना विरुध्दच्या लढाईत सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी लढत असताना गुरुवारी एका रुग्णाने त्याला घराचे कोणीही नेण्यास येत नसल्याच्या कारणातून रुग्णालयाच्या दुसऱया मजल्यावरुन खाली उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारात रुग्ण गंभीर झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
हरिदास रामचंद्र माने वय 70 रा. पेडगाव, ता. खटाव असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या रुग्ण व्यक्तीचे नाव आहे. ते आजारी असल्याने रुग्णालयात दाखल आहेत. गुरुवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास त्यांनी घरचे व नातेवाईक त्यांना नेण्यास येत नसल्याची गोष्ट मनाला लावून घेतली. यातूनच त्यांनी रुग्णालयाच्या दुसऱया मजल्यावरुन खाली उडी मारली. हा प्रकार कळताच रुग्णालयात खळबळ उडाली.
रुग्णालय प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. उडी मारल्यामुळे हरिदास माने गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. याबाबतची फिर्याद योगेश वाळवेकर यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार इष्टे करत आहेत.








