नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा भाऊ असे संबोधल्याने त्यांच्यावर जोरदार टीका सुरू झाली आहे. सिद्धूंचे भाष्य म्हणजे काँग्रेसचे सुनियोजित कारस्थान असल्याचा आरोप भाजपने केला आहे. कर्तारपूर साहिबच्या दर्शनासाठी पाकिस्तानात गेलेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांच्या वक्तव्यावरून राजकारण सुरू झाले आहे. शनिवारी सिद्धू यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा भाऊ असे म्हटले. तसेच इम्रानने आपल्याला खूप प्रेम दिले आहे, असेही ते पुढे म्हणाले. सिद्धूंच्या या वक्तव्यावर भाजपने संताप व्यक्त केला. सिद्धू यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानवर प्रेम दाखवले आहे. ते नेहमीच पाकिस्तानचे कौतुक करत असतात. हा काँग्रेसचा सुनियोजित कट आहे, असे भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी स्पष्ट केले. कर्तारपूर कॉरिडोर भेटीदरम्यान सिद्धू यांचे पाकिस्तानात आगमन होताच त्यांचे शाही स्वागत करण्यात आले. पाकिस्तानच्या भूमीवर पाऊल ठेवताच त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. यानंतर कर्तारपूर साहिबच्या सीईओंनी त्यांचे स्वागत केले.









