नलिनकुमार कटील यांनी घेतला समाचार
प्रतिनिधी / बेळगाव
काँग्रेसने आपल्या नेत्यांना महिलांचा सन्मान करण्यास शिकवावे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महिलांचा अवमान केला आहे. माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री कै. सुरेश अंगडी यांनी केलेल्या विकासकामाच्या जोरावरच मंगला अंगडी या 3 ते 4 लाख मतांच्या फरकाने निवडून येतील, असा विश्वास भाजपचे राज्याध्यक्ष नलिनकुमार कटील यांनी व्यक्त केला.
रविवारी हॉटेल यु. के. 27 येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेसवर तोंडसुख घेतले. काँग्रेस पक्ष हा लयाला गेलेला पक्ष असून बेळगाव लोकसभा मतदारसंघात त्यांचा कोणताही प्रभाव उरलेला नाही. त्यामुळे मंगला अंगडी निवडून येणार हे निश्चित आहे. राज्यात सध्या नेतृत्व बदलाचा कोणताही विचार नाही. आमदार यत्नाळ यांना नोटीस पाठवून देण्यात आल्याची माहिती यावेळी नलिनकुमार कटील यांनी दिली.
उद्योगमंत्री जगदीश शेट्टर म्हणाले, गांधी घराण्यातील इंदिरा गांधी, सोनिया गांधी व आता प्रियंका गांधी यांनी राजकारणात येऊन निवडणुका लढविल्या आहेत. मग कै. सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी यांनी निवडणूक लढविताना काँग्रेसकडून त्यांच्यावर का टीका केली जाते? हा समस्त महिलावर्गाचा अपमान असून माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महिलांची माफी मागावी, असे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार अनिल बेनके, माजी आमदार व बेळगाव ग्रामीणचे अध्यक्ष संजय पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.









