इंडोनेशिया मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धा
@ बाली / वृत्तसंस्था
भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू व किदाम्बी श्रीकांत यांनी आपली विजयी घोडदौड कायम राखत इंडोनेशिया मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन सिंधूने तुर्कीच्या नेस्लिहन यिगितचा 21-13, 21-10 अशा फरकाने फडशा पाडला. महिला एकेरी उपांत्यपूर्व फेरीतील ही लढत अवघ्या 35 मिनिटात निकाली झाली. पुरुष गटात किदाम्बी श्रीकांतने आपलाच राष्ट्रीय सहकारी एचएस प्रणॉयला 21-7, 21-18 अशा फरकाने मात दिली.
येथील विजयासह पीव्ही सिंधूने तुर्की प्रतिस्पर्धी यिगितविरुद्ध 4-0 अशी विजयी घोडदौड कायम राखली. आजवर झालेल्या चारही लढतीत सिंधूचा विजयी धडाका लक्षवेधी ठरत आला आहे. हैदराबादची ही 26 वर्षीय खेळाडू मागील महिन्यात डेन्मार्क ओपनमध्येही यिगितविरुद्ध विजयी ठरली होती.
पुरुषांच्या गटात माजी अव्वलमानांकित श्रीकांतने एचएस प्रणॉयविरुद्ध आपला सर्वोत्तम खेळ साकारताना पहिल्या गेममध्ये अवघे 7 गुण दिले. त्या तुलनेत दुसऱया गेममध्ये मात्र प्रणॉयने त्याला अंतिम टप्प्यापर्यंत झुंजवले. मागील लढतीत टोकियो ऑलिम्पिक सुवर्णजेत्या व्हिक्टर ऍक्सेल्सनला पराभवाचा धक्का देणाऱया प्रणॉयने येथेही दुसऱया गेममध्ये एकवेळ 5-2 अशी भरभक्कम आघाडी घेतली होती. पण, अंतिमतः श्रीकांतला विजयावर शिक्कामोर्तब करण्यात यश प्राप्त झाले. श्रीकांतने उपांत्य फेरीत धडक मारण्याची ही सलग दुसरी वेळ ठरली.
आता तो उपांत्य लढतीत थायलंडच्या व्हितीडॅर्न किंवा डेन्मार्कच्या अँडर्स ऍन्टोन्सेनविरुद्ध लढेल. सिंधूसमोर उपांत्य लढतीत जपानाच्या यमागुचीचे कडवे आव्हान असणार आहे.









