प्रतिनिधी / सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघामार्फत आयोजित करण्यात आलेल्या उत्कृष्ट वाचक स्पर्धेत कणकवलीच्या वाचन संस्कृती विकास उपक्रमाची अध्यक्षा सिद्धी वरवडेकर यांनी घवघवीत यश संपादन केले. ही स्पर्धा रा.ब. अनंत देसाई वाचनालय कुडाळ येथे पार पडली.
स्पर्धेसाठी दरवर्षी नामवंत लेखक किंवा कवी निवडून त्यांच्या साहित्य कृतिवर उत्कृष्ट वाचक स्पर्धा घेतली जाते.यावर्षी वि.स. खांडेकर हे लेखक निवडण्यात आले.सिद्धी वरवडेकर यांनी खांडेकरांच्या “फुले आणि दगड” या कथासंग्राहाचे विवेचन केले.हे पुस्तक माणसाच्या दैनंदिन जीवनाशी कसे निगडीत आहे याची मांडणी केली होती.या स्पर्धेपूर्वी कणकवली नगर वाचनालयात झालेल्या तालुका स्तरावरील वाचक स्पर्धेतही सिद्धी वरवडेकर यांनी व्दितीय क्रमांक मिळविला होता. जिल्हा स्तरावर वाचक स्पर्धेत एकूण बावीस स्पर्धक सहभागी झाले होते.यात सिद्धी वरवडेकर यांनी व्दीतीय क्रमांक मिळविला. वरवडेकर या कणकवली गोपुरी आश्रम वाचन संस्कृती विकास उपक्रमाच्या अधक्षा असून कणकवली कॉलेज मध्ये तृतिय वर्ष कला वर्गात ‘इंग्रजी’ विषयाचे अध्ययन करत आहेत. जुलै २०१९ या महिन्यात गोपुरी आश्रम वाचन संस्कृती विकास उपक्रमाच्या वाचक विवेचन कार्यक्रमात कादंबरीकार प्रा.प्रवीण बांदेकर यांच्या ‘ईंडियन अॅनिमल फार्म’ या कादंबरीचे त्यांच्याच समोर उत्कृष्ट विवेचन करुन बांदेकर यांची वाहवा मिळवली होती.
सिद्धी वरवडेकर यांच्या यशाबद्दल गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंबरकर, कणकवली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजीराव शिंदे, सिद्धी यांचे वडील मारुती वरवडेकर यांनी अभिनंदन केले आहे.









