प्रतिनिधी/ मडगाव
भाजप पक्षाने श्रीमंतांचा उदोउदो करण्याचे धोरण राबविले असून देशात ‘सावकारी’ राजवट आणण्यात व्यस्त आहे. त्यामुळेच भाजप सरकारला गरीब शेतकऱयांच्या व्यथा कळत नाहीत. भाजपच्या हय़ा धनाडय़ांच्या प्रेमामुळेच भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांना राजभवनावरील काँग्रेसच्या भव्य मोर्चात सामिल झालेले शेकडो कष्टकरी ‘शेतकरी’ दिसले नव्हते अशी टिका गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी रिवण येथे काँग्रेस तर्फे आयोजित किसान मेळाव्यात बोलताना केली.
काँग्रेस पक्ष शेतकऱयांचे प्रश्न व समस्या सोडविण्यास वचनबद्द आहे. आज आमचे राष्ट्रीय नेते राहूल गांधी पंजाब-हरयाणा या कृषीप्रदान राज्यांत शेतकऱयांबरोबर रस्त्यावर उतरुन आंदोलन करीत आहेत. सरकारने शेतकरी विरोधी कायदे मागे घेई पर्यंत आमचा लढा चालूच राहणार असल्याचे गिरीश चोडणकर म्हणाले.
केंद्रीयमंत्री जावडेकर शेतकऱयांना का भेटले नाही
भाजपला जर शेतकऱयांचा खराच पुळका असता तर गोव्यातील ऊस, काजू, सुपारी, नारळ तसेच भातशेती करणाऱयां गोमंतकीय शेतकऱयांच्या व्यथा व समस्या ऐकुन घेण्यासाठी मागच्या आठवडय़ात गोव्यात भाजपची जाहिरतबाजी करण्यास आलेले केंद्रियमंत्री प्रकाश जावडेकर शेतकऱयांना का भेटले नाहीत असा प्रश्न विरोधीपक्ष नेते दिगंबर कामत यांनी यावेळी विचारुन, भाजपने आणलेल्या नव्या कायद्याने विविध पिकांसाठी मिळणारी सरकारी आधारभूत किंमत यापुढे बंद करुन शेतकऱयांना मोठय़ा उद्योगपती व व्यापाऱयांच्या घशात घालण्याचे कारस्थान भाजप सरकारने आखल्याचा आरोप केला.
नवीन शेतकरी कायद्यानुसार यापुढे कांदा, बटाट, कडधान्ये, डाळी या जीवनावश्यक वस्तुच्या यादीतून वगळण्यात आल्या असून, यापुढे जनतेला या वस्तुंचे भाव धनाडय़ व्यापाऱयांच्या मर्जीनुसार फेडावे लागतील असा गंभीर इशारा दिगंबर कामत यांनी यावेळी दिला.
भाजपचा सर्वात जूना मित्रपक्ष असलेल्या कृषी प्रदान पंजाबच्या अकाली दलाने आज भाजपची साथ सोडली आहे. याचा भाजप नेत्यांनी बोध घ्यावा व आत्मपरिक्षण करावे असा सल्ला दिगंबर कामत यांनी या मेळाव्यात बोलताना दिला.
भाजप गरीबा प्रती असंवेदनशील
‘क्रोनी कॅपिटालीस्टां’चे हित जपणाऱया भाजपला देशातला गरीब दिसत नाही. लॉकडाऊन काळात हजारो मैल पायी चालत आपल्या गावी परतणाऱया अनेक मजुरांचे प्राण गेले त्याची माहिती केंद्रातील मोदी सरकारकडे नसल्याचे उत्तर लोकसभेत देऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील गरीब जनतेच्या प्रती असलेली सरकारची असंवेदनशीलता उघड केली आहे. त्यामुळेच सामान्य जनतेचा आक्रोश आज भाजपच्या कामावर पडत नाही. केवळ उत्सवी वातारणात राहुन मोदींचा उदोउदो करण्याच्या आभासी दुनियेत आज भाजप सरकार वावरत आहे असा टोला खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी यावेळी बोलताना हाणला.
काँग्रेस पक्षाने देश स्वतंत्र्य झाल्यानंतर भारतात अनेक प्रकल्प उभारले. रेल्वे, दळणवळण, दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवून आणली. हरित क्रांती व धवल क्रांतीने शेतकऱयांना उर्जा मिळाली. अखिल भारतीय आर्युविज्ञान संस्था, भाभा अणुसंधान केंद्र, स्टिल अथोरिटी ऑफ इंडिया, आयआयएम असे अनेक प्रकल्प व संस्था स्थापन केल्या. परंतु, धनाडय़ांकडुन भरघोस देणग्या घेऊन केवळ आपला स्वार्थ बघणाऱया भाजपने मागील सहा वर्षात देश विक्रीस काढला आहे असा दावा खा. सार्दीन यांनी यावेळी बोलताना केला.
नवा कृषी कायदा आणल्याने ‘दलाली’ बंद होणार असे सांगणाऱया केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकरांना सदर कायद्यामुळे राज्य सरकारला 9 कोटी नुकसान होणार असे स्पष्ट सांगणारे भाजपचेच ज्ये÷ नेते प्रकाश वेळीप हे ‘दलाल’ वाटतात का हे त्यांनी स्पष्ट करावे अशी मागणी काँग्रेस किसान मोर्चाचे निमंत्रक अभिजीत देसाई यांनी केली.
भाजपच्या ‘जुमला’ राजवटीला आता जनता कंटाळली आहे. काँग्रेसच्या किसान मेळाव्याला मिळालेला भव्य प्रतिसाद पाहून त्यांच्या पायांखालची जमीन सरकणार आहे. आजचा मेळावा हा भाजपला सत्तेपासुन दूर नेण्याची नांदी आहे असा विश्वास स्थानिक शेतकरी बोसत्यांव सिमोईस यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
काँग्रेस पक्ष गरीब व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी वचनबद्ध आहे. आगामी काळात आंदोलनाची धार तीव्र करुन आम्ही जनतेला न्याय मिळवून देणार आहोत असे सांगे गट काँग्रेस अध्यक्षा जोसफीना रोड्रीगीस यांनी यावेळी बोलताना सांगितले.
व्हिकेएसएस सोसायटीचे अध्यक्ष व माजी सरपंच जुझे आफोंसो यानी भाजप सरकारच्या किसान विरोधी कायद्यावर टिका केली. काँग्रेसचे प्रदेश सचिव रजनीकांत नाईक यांनी स्वागत केले तर सांगे युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश भगत यांनी आभार व्यक्त केले. सूत्रसंचालन अमरनाथ पणजीकर यांनी केले.
या मेळाव्याला काँग्रेसचे सरचिटणीस प्रदीप नाईक, सचिव दामोदर शिरोडकर, नगरसेवक अविनाश शिरोडकर व स्थानिक शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









